ठाणे : चित्रपटात काम मिळवून देण्याच्या नावाखाली उदयोन्मुख कलाकारांची आणि त्यांच्या पालकांची फसवणूक करणा-या संदीप महादेव व्हरांबळे उर्फ संदीप पाटील उर्फ सँडी (३२, रा. कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे) या भामटयास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्याने राज्यभरातील १०० ते १५० उदयोन्मुख कलाकारांची १० ते १५ लाखांची फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.डोंबिवलीतील रहिवाशी रविंद्र कुलकर्णी यांचा मुलगा अद्वैत याला सिनेमा, टीव्ही मालिका तसेच जाहिरातींमध्ये काम मिळवून देतो, अशी बतावणी करीत त्याचा पोर्टफोलिओ बनवावा लागेल. त्यासाठी ११ हजार रुपये द्यावे लागतील, असे संदीप पाटील याने सांगितले होते. कुलकर्णी यांना स्वत:च्या बँक खात्याचा क्रमांक देऊन त्या खात्यावर ११ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. ते त्यांनी जमा केल्यानंतरही कुलकर्णी यांना त्यांच्या मुलाचा पोर्टफोलिओ देण्यात आला नाही. तसेच त्यास चित्रपट, टीव्ही मालिका किंवा जाहिरातीमध्येही भूमीका करण्याचे काम मिळवून दिले नाही. शिवाय, त्यांचे ११ हजार रुपये देखिल परत केले नाही. याप्रकरणी कुलकर्णी यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्याकडे गाºहाणे मांडले. पवार यांनी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटकडे सोपविले. पोलीस उपायुक्त दीपक देवराज वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण शिंदे यांनी केलेल्या चौकशीमध्ये कुलकर्णी यांच्याप्रमाणे संदीप पाटील या भामटयाने आणखीही अशाच प्रकारे पैसे काढून सुमारे चार लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याची बाब समोर आली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार संदीप पाटील याला ५ आॅगस्ट रोजी घोडबंदर रोड, कासारवडवली येथील ‘रोझा गार्डन’ या इमारतीमधील त्याच्या घरातून अटक करण्यात आली.............................महाराष्टÑासह गोव्यातही गुन्हे दाखलयातील भामटा संदीप पाटील याच्याविरुद्ध कोल्हापूर जिल्हयातील भूदरगड, करवीर, इस्पोली पोलीस ठाण्यात तसेच रत्नीगिरी जिल्हयातील रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील फरासखाना, नवी मुंबईतील वाशी तर गोवा राज्यातील पणजी पोलीस ठाण्यात १७ गुन्हे दाखल असल्याचीही माहिती चौकशीत उघड झाली आहे. याशिवाय, मुंबईतील बोरीवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्हयातही तो अद्याप पसार आहे.