ठाणे : एका वकीलाच्या नावाने बनावट पॅन कार्ड आणि आधारकार्ड बनवून त्यावर मोबाइलसाठी कर्ज काढून या वकीलासह मोबाइलच्या दुकानदाराला गंडा घालणा-या दिवाकर बृजकिशोर जैसवाल (३८, रा. शांतीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी अटक केली आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता.ढोकाळी येथील रहिवाशी असलेले वकील निखील पुजारी (३५) यांच्या नावाचे तसेच दुस-याचा फोटो असलेले बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्ड दिवाकर याने बनविले होते. त्यानंतर त्यांचे वीज बिलही त्याने मिळविले होते. त्याच आधारावर आदित्य बिर्ला फायनान्स कंपनीकडून मोबाइलसाठी ११ हजार ९४ रुपयांचे कर्ज घेतले. त्या आधारे टेंभी नाका येथील आर. के. मोबाइल शॉप यांच्याशी संगनमत करुन त्याने १९ जून २०१८ रोजी नविन मोबाइल खरेदी केला होता. कर्ज असल्यामुळे त्याला मुळ खरेदी पावती मिळालेली नव्हती. तरीही त्याने तो अन्य एकाला अल्प किंमतीमध्ये विक्री केला होता. दरम्यान, या मोबाइल कर्जाबाबत अॅड. निखील पुजारी यांच्याकडे कर्जाचे हाप्ते भरण्यासाठी फायनान्स कंपनीने विचारणा केली. तेंव्हा आपण कोणतेही कर्जच घेतले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी २५ एप्रिल २०१९ रोजी फसवणूक प्रकरणी आरके मोबाइल शॉपचे मालक किसन सिंग आणि या दुकानातील आदित्य बिर्ला फायनान्स कंपनीच्या वतीने कर्जाचे काम करणारे त्यांचे कर्मचारी अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, निरीक्षक विकास घोडके यांनी गोपनीय माहितीच्या आधारे दिवाकर जैसवाल याला ५ आॅगस्ट रोजी ठाण्यातील शांतीनगर भागातून अटक केली. त्याने आणखीही अशाच प्रकारे चार ते पाच जणांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपास नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे करीत आहेत.