ठाणे : अमेरिकेतील कंपनीसोबत भागीदारीमध्ये चंद्रपूर येथे कोळशाद्वारे खतनिर्मिती कारखाना सुरू करण्याचे आमिष दाखवत चंद्रकुमार जाजोडिया यांची पाच कोटी ७० लाखांची फसवणूक करणाऱ्या मारुती गुड्डी, मनीषा गुड्डी (रा. दोघेही विजयवाडा, आंध्र प्रदेश), श्रीवर्धन रेड्डी आणि रवी केशव या चौघांसह इतरांविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले आहे.मारुती आणि मनीषा रेड्डी या दाम्पत्यासह चार ते पाच जणांनी ठाण्याच्या ‘नीळकंठ वुड्स’ येथे एक कंपनी स्थापन केली. या कंपनीद्वारे चंद्रपूर येथे अमेरिकेतील कंपनीसोबत कोळशाद्वारे खत बनवण्याचा कारखाना सुरू करणार असल्याचे भासवले. त्या प्रकल्पासाठी शासकीय खात्यांमार्फत विविध परवानग्या घेतल्याची बनावट कागदपत्रे त्यांनी तयार केली. याच प्रकल्पामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने स्वारस्य दाखवले असून त्यासाठी ते अनुदान देणार असल्याची बतावणी केली. त्यामुळे त्यांच्या कंपनीत भागीदारीसाठी २०१६ ते जून २०१७ पर्यंत कंपनीच्या खात्यात धनादेश, आरटीजीएस तसेच एनएफटीद्वारे दोन कोटी १० लाख रुपये देण्यास ठाण्याच्या मानपाड्यातील चंद्रकुमार जाजोडिया यांना भाग पाडले. त्याव्यतिरिक्त कंपनीच्या इतर कामकाजासाठी आणखीही काही रक्कम खर्च करण्यास त्यांना भाग पाडले. तसेच त्यांच्या अन्य एका कंपनीचा ‘आरे’ या दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपनीसोबत तीन वर्षांचा करार झाल्याचे सांगितले. त्याचीही बनावट कागदपत्रे दाखवून त्यामधील कराराप्रमाणे त्यातही चांगला फायदा होणार असल्याचे भासवले. त्याही कंपनीमध्ये भागीदार होण्यासाठी चंद्रकुमार जाजोडिया यांना ५५ लाख रुपये देण्यास भाग पाडले. तसेच त्यांच्या कंपनीच्या उद्घाटनासाठी भारताचे पंतप्रधान येणार असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली. कागदपत्रे दाखवून करोडोंची रक्कम त्यांच्याकडून भागीदारीकरिता घेऊनही ठरल्याप्रमाणे कंपनीचे काम वेळेत सुरू न केल्याने तसेच दुसºयाही कंपनीचे काम न मिळाल्याने मारुती गुड्डी आणि इतरांनी गुंतवणूक केलेली पाच कोटी ७० लाखांची रक्कम परत देणार असल्याचा दावा केला होता. तसा जाजोडिया यांच्याशी त्यांनी करारही केला. त्याप्रमाणे पुढील तारखांचे धनादेश दिले. मात्र, हे धनादेश बँकेत वटले नाही. त्यानंतर, वारंवार विचारणा करूनही जाजोडिया यांना पैसे देण्यास ते तयार झाले नाहीत. त्यामुळे खोटी माहिती आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे जाजोडिया यांची पाच कोटी ७० लाखांना फसवणूक केल्याबद्दल त्यांनी याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात २५ मे २०१९ रोजी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण आता ठाणे शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक शाखेकडे वर्ग केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले.
अमेरिकेतील कंपनीसोबत खतनिर्मितीच्या कारखान्याचे अमिष दाखवून साडे पाच कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:21 PM
अमेरिकेतील कंपनीसोबत खतनिर्मिती केली जाणार असल्याची बतावणी करीत थेट पंतप्रधान प्रकल्पाच्या उद्घाटनाला येणार असल्याची बतावणी करीत पाच कोटी ७० लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून ठाण्यातील व्यावसायिकालाच आंध्रप्रदेशातील गुड्डी दाम्पत्याने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठळक मुद्दे ठाण्यातील व्यावसायिकाला गुंतवणूकीच्या अमिषाने गंडा आंध्रप्रदेशच्या गुड्डी दाम्पत्यासह चौघांचा समावेश प्रकरण ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग