मीरा रोड : महिलेच्या मधाळ आवाजात बाेलून १९ व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दाेघा भामट्यांना मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मनीष शशिकांत आंबेकर (४४, पळस्पे, पनवेल) आणि अन्वर अली कादीर शेख (४८, रा. कर्जत, रायगड) अशी त्यांची नावे आहेत. लेडीज बारमध्ये पैसे उधळून माैजमजेसाठी ते हे कृत्य करीत हाेते. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये त्यांच्याविराेधात १९ गुन्हे असल्याचे उघड झाले आहे.
भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावरील श्रीराम ज्वेलर्सचे व्यवस्थापक चेतन जैन यांना ७ मे रोजी मनीष याने महिलेच्या आवाजात कॉल केला. त्यानंतर मालक दिनेशकुमार जैन यांना आपण डॉक्टर असून, सोन्याच्या चार तोळ्यांच्या बांगड्या बनवायच्या असल्याचे सांगितले. बांगड्यांची साइज आणि दाेन लाखांची आगाऊ रक्कम देण्यासाठी काेणाला तरी साई आशीर्वाद रुग्णालयाजवळ पाठविण्यास सांगितले. दाेन हजारांच्या नाेटा असल्याने दाेन लाखांच्या ५०० च्या नाेटा आणण्यास सांगितले.
दिनेशकुमार यांनी चेतन यांना दाेन लाखांच्या ५०० च्या नोटा घेऊन पाठवले. तेथे जाताच पहिल्या मजल्यावर मनीषने त्यांना अडवले. तुम्ही तिसऱ्या मजल्यावर जाऊन मॅडमकडून साइज व चार लाख रुपये घ्या, असे सांगून साेबतचे दाेन लाख माेजण्यासाठी घेतले. तिसऱ्या मजल्यावर गेले असता तेथे कोणीच डॉक्टर महिला नसल्याचे समजले. चेतनने पहिल्या मजल्यावर येऊन पाहिले असता मनीष तेथे नव्हता. या प्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात ८ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे व कैलास टोकले यांच्यासह संदीप शिंदे, किशोर वाडीले, संजय पाटील, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन सावंत, प्रफुल्ल पाटील, समीर यादव, प्रशांत विसपुते, सनी सूर्यवंशी तसेच सायबर शाखेचे कुणाल सावळे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखेने आंबेकर व शेख यांना काशिमीरा पोलिस ठाणे हद्दीतील स्प्रिंग या लॉजमधून अटक केली. त्यांच्याकडून साडे नऊ हजार रुपये रोख व तीन मोबाइल जप्त केले आहेत. त्यांना नवघर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
आतापर्यंत कुणाला फसवले?
लोणीकंद येथील पुणे ज्वेलर्स, पुण्याच्या सहकारनगरमधील मेडिकल, स्वारगेट येथील रक्ताचे नाते रक्तपेढी, कोपरखैरणे येथील छत्रपती संभाजी महाराज पतपेढी, खांदेश्वर येथील मेडिकल दुकान व मराठा ज्वेलर्स, नाशिक येथील चितळे स्वीट, कळंबोली येथील राधिका ज्वेलर्स, पनवेल येथील पनवेल ज्वेलर्स, कोल्हापूरच्या शाहूपुरी येथील वेलनेस मेडिकल, मीरा रोडच्या शांती पार्क येथील शबनम ज्वेलर्स आदींच्या चालकांना फसविले आहे.