उल्हासनगर : कॅम्प नं-२ येथील व्यापारी भारत कारीरा यांनी दुकांदाराकडून मॅगीचे बिल गोळा करण्यासाठी ठेवलेल्या दिनेश माखिजा या नोकराने, वसूल केलेली ८१ हजार ३८० रुपयांची रक्कम लंपास केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील व्यापारी भारत माखिजा यांची निखिल इंटरप्रायजेस कंपनी असून कंपनी तर्फे शहरातील दुकानदारांना मॅगीचा पुरवठा केला जातो. कॅम्प नं-१ व २ परिसरातील एकून ३८ दुकानदाराकडून मॅगीचे बिल वसुली करण्यासाठी दिनेश राजेश माखिजा याला कामाला ठेवले होते.
२९ जुलै रोजी वसूल केलेल्या मॅगीच्या बिलाची रक्कम ८१ हजार ३८० रुपये यांचा हिशेब व रोख रक्कम न देता नोकर दिनेश माखिजा हा कामाला न येता पळून गेल्याचे उघड झाले. भारत कारीरा यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिल्यावर, पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.