ठाणे : पैसे सुटे करून देण्याच्या नावाखाली मीरा रोड येथील राजीव सहानी याच्यासह चौघांनी भार्इंदर येथील आकाश दोशी यांच्याकडून साडेआठ लाखांची रोकड लुटल्याचा प्रकार २१ मार्च रोजी घडला. याप्रकरणी त्यांनी ८ एप्रिल रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.आपण एक संस्था चालवत असल्याची राजीव यांनी बतावणी करून संस्थेसाठी देणगीच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या लहान रकमेच्या नोटा हाताळण्यासाठी अडचण होत असल्याचे दोशी यांना सांगितले. त्यामुळे लहान रकमेच्या नोटांच्या बदल्यामध्ये मोठ्या रकमेच्या नोटा बदलून देण्यासाठी १० टक्के कमिशन देऊन रोख रक्कम बदली करून देतो, असेही त्यांना सांगितले. त्यासाठीच त्यांना राजीव सहानी, मुकेश, अमन आणि मनोज या चौघांनी २१ मार्च रोजी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील विजय गार्डन येथे बोलवून १०० रुपये दराच्या बंडलांच्या नोटा आणि निळ्या रंगाचा झबला दाखवला. त्यानुसार, दोशी यांच्याकडून दोन हजार रुपये दराच्या नोटांची साडेआठ लाखांची रोकड असलेली बॅग या चौघांपैकी अमन याने घेतली. त्यानंतर, १०० रुपयांच्या नोटांचा झबला दोशी यांच्या गाडीमध्ये ठेवण्यासाठी पायी जात असताना रिक्षातून आलेल्या त्यांच्याच तीन ते चार साथीदारांनी त्याला नोटांच्या झबल्यासह रिक्षामध्ये बसवून नेले. त्यानंतर, काहीतरी गोंधळ झाल्याचा बहाणा करून राजीव याने पुन्हा हे पैसे मिळतील, असे दोशी यांना सांगितले. प्रत्यक्षात त्यांना कोणतेही पैसे दिले नाही. अखेर, याप्रकरणी दोशी यांनी ८ एप्रिल रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींना आम्ही लवकरच ताब्यात घेऊ, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांनी सांगितले. उपनिरीक्षक आर.व्ही. रत्ने याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पैसे सुटे करून देण्याच्या नावाखाली ठाण्यात साडेआठ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 10:33 PM
मीरा रोड येथील चौघांनी भार्इंदर येथील आकाश दोशी यांच्याकडून पैसे सुटे करून देण्याच्या नावाखाली साडेआठ लाखांची रोकड लुटल्याचा प्रकार २१ मार्च रोजी घडला. आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ, असे पोलिसांनी सांगितले.
ठळक मुद्दे दहा टक्के कमिशन देण्याचे दाखविले अमिषरोकड मिळाल्यावर चौकडीने केले पलायनघोडबंदर रोड येथील घटना