ठाणे : सुटे पैसे देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करणा-या मनिष आंबेकर या भामट्याला अखेर नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी (१४ डिसेंबर रोजी) रात्री १० वाजताच्या सुमारास अटक केली आहे. त्याच्या आणखी साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीन महिन्यांपूर्वी त्याने एका महिलेच्या मदतीने वागळे इस्टेट येथील अक्षय मदने या तरुणाची सुटे पैसे देण्याच्या नावाखाली ३० हजारांची फसवणूक केली होती. कोणत्याही रुग्णालयाजवळील एखाद्या सोनाराला अथवा एखाद्या व्यापा-याला सुटे पैशांची गरज असल्याचे किंवा सोने खरेदीसाठी सुटे पैशांची गरज असल्याची बतावणी मनिष आणि त्याची महिला साथीदार फोनवरून करीत होते. नौपाडा आणि वागळे इस्टेट परिसरातील अशा अनेक व्यापाºयांना आणि रुग्णालयांना या दुकलीने लाखो रुपयांना गंडा घातला आहे. २४ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी ३.३० वा. च्या सुमारासही एका अनोळखी महिलेने वागळे इस्टेट जिजामातानगर येथील रहिवाशी अक्षय मदने यांच्या फोनवर संपर्क साधून वागळे इस्टेट, रामचंद्रनगर, आकांक्षा सोसायटी येथील लाभेश सोसायटी येथून डॉ. कोरडे यांनी मागविल्याप्रमाणे कॉन्टॅक्ट लेन्स आणि ३० हजार रुपये घेऊन मदने हे लाभेश सोसायटी येथे गेले. तेंव्हा यातील मनिष या भामट्याने ‘आपण डॉक्टर कोरडे यांचा मुलगा असल्याची बतावणी केली. पेशंटला अर्जट सुटे पैसे द्यायचे आहेत. तुम्ही आणलेले ३० हजार रुपये मला द्या,’ याच इमारतीमध्ये आम्ही चौथ्या मजल्यावर राहतो, अशीही त्याने बतावणी केली. तुम्ही आणलेले कॉन्टॅक्ट लेन्स घरी नेऊन द्या आणि पूर्ण पैसे आईकडून घ्या, असेही त्याने सांगितले. नंतर मदने यांच्याकडून ३० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. त्याला परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने १४ डिसेंबर रोजी अटक केली. त्याने नौपाडयातील मुकेश दहिवाळ (३३, रा. पाचपाखाडी, ठाणे) यांचीही अशाच प्रकारे फसवणूक केली होती. त्याच्याकडून असे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.-------------