ठाणे : नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक करणार्या पाच आरोपींना ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली. जवळपास ६0 बेरोजगारांची कोटीपेक्षा जास्त रुपयांनी फसवणूक करणार्या या आरोपींकडून शासकीय कार्यालयांचे बनावट शिक्के आणि कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली.नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील शेतकरी दिलीप नागू पाटील यांचा मुलगा मयुर आणि अन्य काही युवकांना पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून भांडुप येथील दिनेश बबनराव लहारे याने दीड वर्षापूर्वी १७ लाख ५0 हजार रुपये घेतले होते. त्यांच्यातील व्यवहार ठाण्यात झाल्याने नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुशिक्षित बेरोजगारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याने गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ ला या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांनी दिनेश लहारेची गोपनीय सुत्रांकडून माहिती गोळा केली. त्यानुसार धोबी आळीतील गणेश टॉकीजजवळ तो येणार असल्याची माहिती नितिन ठाकरे यांना शुक्रवारी मिळाली. पोलीस निरीक्षक रणविर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदिप बागुल, अविराज कुºहाडे आणि समीर अहिरराव यांनी सापळा रचून आरोपीस त्याला केली.आरोपीच्या चौकशीतून त्याच्या चार साथीदारांची नावे समोर आली. त्यानुसार ठाण्यातील धोबी आळीतील विनय अनंत दळवी, घोडबंदर रोडवरील आनंद नगरातील प्रविण वालजी गुंटन, नाशिक येथील साई नगरातील रमेश बाजीराव देवरे आणि भांडुप येथील कोकणनगरातील शंकर बाबुराव कोळसे यांना अटक करण्यात आली. आरोपींनी वेगवेगळ्या विभागांमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या भूलथापा देऊन आतापर्यंत ६१ उमेदवारांची फसवणूक केली. त्यापैकी ३१ उमेदवारांकडून ८६ लाख ५0 हजार रुपये आरोपींनी वसुल केले असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली. याशिवाय आणखी ३0 उमेदवारांची फसवणूक झाली असून, त्यांची माहिती पोलीस यंत्रणेकडून काढली जात आहे. आरोपींनी लोकांना एक कोटीपेक्षा जास्त रुपयांनी गंडा घातल्याचा अंदाज अधिकार्यानी व्यक्त केला. विविध शासकीय कार्यालयांचे ३३ शिक्के आणि लेटरहेड आरोपींजवळून हस्तगत करण्यात आले. आरोपींविरूद्ध अहमदनगर तसेच संगमनेर येथेही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. दिनेश लहारे हा या प्रकरणाचा सुत्रधार असून प्रविण गुंटन हा रबरी शिक्के बनविणारा आहे. उर्वरित तीन आरोपींनी बेरोजगारांची फसवणूक करण्यासाठी कधी तोतया अधिकारी तर कधी दलालांची भूमिका वठविली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सहायक पोलीस निरीक्षक संदिप बागुल या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक, ठाण्यात पाच आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 7:56 PM
शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरूणांना लुबाडणार्या पाच आरोपींच्या मुसक्या ठाणे पोलिसांनी आवळल्या. अनेक वर्षांपासून ही टोळी या गोरखधंद्यात गुंतल्याचा संशय असून, त्यांनी जवळपास एक कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.
ठळक मुद्देशासकीय कार्यालयांचे शिक्के, बनावट पत्रे हस्तगत६१ बेरोजगारांची फसवणूक केल्याचा संशयआरोपी २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीतएक कोटीपेक्षा जास्त रुपयांचा गंडाआरोपींविरूद्ध संगमनेर, अहमदनगरमध्येही फसवणुकीचे गुन्हे