उल्हासनगर : रजेवर जातानाही महापालिकेतील आपल्या कार्यालयाची चावी सोबत घेऊन गेलेले जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कार्यालयात कोरे चेक, राज्य सरकारतर्फे दिली जाणारी उपायुक्ताची बनावट ओळखपत्रे आणि विविध विभागाच्या ५० पेक्षा अधिक फायली सापडल्या. त्यांच्या केबिनची बुधवारी इन कॅमेरा झाडाझडती घेण्यात आली. त्यात हा ऐवज सापडल्याने आयुक्त नेमकी कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे नियुक्तीच्या दिवसापासून वादात सापडले आहेत. त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल असून महासभेने त्यांना बडतर्फ केले. मात्र त्या बडतर्फीला न्यायालयीन स्थगिती मिळाल्याने ते कामावर आहेत. गेल्याच महिन्यात त्यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या बनावट जन्मतारखेची चर्चा सुरू आहे. १४ मे पासून भदाणे रजेवर आहेत. पण जाताना नियमानुसार त्यांनी केबिनची चावी पालिकेत जमा न करता स्वत:सोबत नेल्याची आणि केबीनमध्ये काही फायली लपवल्याची तक्र ार रिपब्लिकन पक्षाचे गटनेता भगवान भालेराव यांनी आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे केली. त्यात तथ्य आढळल्याने आयुक्तांनी उपायुक्त संतोष दहेरकर यांना केबीन सील करण्याचे आदेश दिले. भदाणे यांच्या वाहनचालकाने बुधवारी चावी पालिकेत जमा केली. त्यानंतर पालिका आयुक्त गणेश पाटील यांच्या आदेशानुसार मुख्यालयाचे उपायुक्त संतोष देहरकर, रिपाइं नगरसेवक भगवान भालेराव, शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुरक्षा अधिकारी बाळू नेटके, मनीष हिवरे, अन्य अधिकारी, नगरसेवक, पत्रकारांसमक्ष भदाणे यांची सीलबंद केबीन इन कॅमेरा उघडण्यात आली. तेव्हा त्यात राज्य शासनाची उपायुक्तपदाचीच राजमुद्रा असलेली विविध ओळखपत्रे सापडली. विविध विभागाच्या १२८ फाईल्स, काही कोरे; तर काही रकमा भरलेले १८ चेक, १७ सीडी, ११ रबरी स्टॅम्प सापडले. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती नेटके यांनी दिली. फाईल चोरीप्रकरणी सध्या भाजपाचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी तुरूंगात आहेत. त्यातच भदाणे यांच्या केबीनमधून घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात आयुक्त पाटील यांना विचारल्यावर ते म्हणाले, भदाणे यांच्या कार्यालयातून जप्त केलेल्या सामग्रीची प्रशासन तपासणी करत आहे. याबाबत कोणती कारवाई करणार, असे विचारता आयुक्तांनी संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.पालिकेचे यापूर्वीचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी वरिष्ठ अधिकाºयांना डावलून भदाणे यांची विशेष अधिकारीपदी नियुक्ती केली होती.त्यांच्या खास मर्जीतील भदाणे यांच्याकडे मालमत्ता कर विभाग, अतिक्र मण विभाग, वादग्रस्त ठरलेले शिक्षण मंडळ, राजीव गांधी आवास योजना, पाणी पुरवठा योजना आदी महत्वाच्या विभागाचा पदभार होता. त्यामुळे प्रचंड नाराजी होती. सध्याचे आयुक्त पाटील यांनी मात्र भदाणे यांच्याकडील विशेष अधिकारीपद काढून त्यांचे मूळ जनसंपर्क अधिकारीपद कायम ठेवले होते.
जनसंपर्क अधिकाऱ्याकडे सापडले कोरे चेक, फायली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:44 AM