डोंबिवली : दावडी येथील गणेशमूर्ती प्रदूषणामुळे काळवंडल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत होता. परिसरातील एकच मूर्ती काळी पडल्याने त्यामागे प्रदूषण हे कारण नसावे, असे तर्कवितर्क प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढले होते. मात्र, खरे कारण शोधण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी सायंकाळी परिसरातील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी यंत्र लावले आहे. हवेची गुणवत्ता चांगली आहे की प्रदूषित, हे त्यामुळे उघड होणार आहे.ओम साई मित्र मंडळाने दावडीचा राजा या गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. मूर्ती काळी पडत असल्याने मूर्तिकाराने तिला पुन्हा रंग दिला. मात्र, त्यानंतरही ती काळवंडत आहे. पूजेची लहान मूर्तीही काळी पडल्याने ती दररोज बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नवीन मूर्तीही जास्त काळी पडत असल्याचे दिसून आले. गणेशमूर्तीचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवून त्याच्या चाचण्या केल्यावर नेमके कारण उघड झाले असते. मात्र, मूर्तीचे नमुने घेतल्यास गणेशाचे पावित्र्य भंग झाले असते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर मोठा पेच होता. पर्यावरणातील जाणकारांनीही चाचणी केल्याशिवाय प्रदूषणामुळेच मूर्ती काळी पडतेय, हे ठोस सांगता येत नाही, असे मत व्यक्त केले होते. दुसरीकडे मूर्ती काळवंडण्याचे खरे कारण समजत नाही, तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन करणार नाही, असा पवित्रा ओम साई मित्र मंडळाने व्यक्त केला होता. अखेरीस दावडीच्या राजा परिसरातील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी शुक्रवारी यंत्र लावले आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले यांनी दिली.>आज निष्कर्ष निघणार? : दावडी परिसरातील हवेची गुणवत्ता यंत्राद्वारे तपासली जाणार आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत प्रदूषणामुळे मूर्ती काळी पडली आहे की नाही, हा निष्कर्ष समोर येण्यास काही अंशी मदत होणार आहे.
दावडीतील हवेची गुणवत्ता तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 3:06 AM