अंबरनाथ : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पाहून राज्य सरकारने गुरुवारी रात्रीपासून पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे रेल्वे पोलिसांकडून काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकात प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या ओळखपत्राची तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता.
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकातून दररोज हजारो प्रवासी मुंबई, ठाणे, नवी मुंबईला नोकरीसाठी प्रवास करतात. मात्र, आता राज्य सरकारच्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश देण्याचे राज्य सरकारचे आदेश असून, त्याची अंमलबजावणी अंबरनाथ रेल्वेस्थानकात केली जात आहे, तर बदलापूर स्थानकात प्रत्येक प्रवाशाचे ओळखपत्र तपासून प्रवाशाला प्रवेश दिला जात होता. सकाळपासून रेल्वे पोलिसांनी अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्त ठेवला असून, प्रवाशांना ओळखपत्र पाहूनच तिकीट आणि रेल्वेस्थानकात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे अनेक सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या दारातूनच माघारी जावे लागले.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांनीही रेल्वेतून प्रवास करण्याचा प्रयत्न सकाळी केला. मात्र, त्यांना पोलिसांनी अडवून पुन्हा घरचा रस्ता दाखवला. अनेक कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करीत घरीच राहणे पसंत केले. अनेक नागरिकांना तिकीट खिडकीवर तिकीट नाकारण्यात आले. कामावर निघालेल्या काही सर्वसामान्य नागरिकांनी बस आणि खासगी वाहनांचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणीही त्यांच्या वाट्याला निराशाच आली.