विशाल हळदे, लोकमत
ठाणे: सामान्य प्रवासी आणि ट्रॅफिक यांचे अतूट नाते असते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण या भागात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत जाताना पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीने ठाण्यात कहर गाठताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या वाहतूक कोंडीचा त्रास खुद्द मंत्र्यांनाच बसला असून, केवळ ठाण्यात तब्बल दोन ते अडीच तास घालवावे लागले.
या मंत्र्यांचे नाव आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ.छगन भुजबळ मुंबईहून ठाणेमार्गे नाशिक जात होते. मात्र, ठाण्यात तीन हातनाका ते अगदी मानकोली फाटा, कल्याण फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी झालेली होती. याचा सामना छगन भुजबळ यांनाही करावा लागला. ठाण्यातून बाहेर पडेपर्यंत छगन भुजबळ तब्बल दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत अडकले होते. छगन भुजबळांसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांची मोठी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. तसेच वाहतूक कोंडीतून वाट काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांना खूपच कसरत करावी लागली, असे सांगितले जात आहे.
केवळ खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा
रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना गेले अनेक दिवस करावा लागत आहे. मुंबईहून नाशिककडे जाणारा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारित येतो. या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. खुद्द एकनाथ शिंदे ठाण्यात राहतात. मात्र, तरीही ठाण्यातील रस्त्यांची दुरावस्था कायम असल्याचे सांगितले जात आहे.
वाहतूक पोलिसांची खड्डे बुजवण्यास सुरुवात
खड्ड्यांमुळे होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता शेवटी कापूरबावडी वाहतूक विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. सहायक पोलिस निरीक्षक सुधीर कदम, पोलिस नाईक नीलेश गरजे, बसवराज पाटील, तायडे तसेच पोलीस हवालदार कांदे यांनी हातात कुदळ, फावडा घेऊन रॅबिट टाकून खड्डे बुजवायला सुरुवात केली.