ठाणे : महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. छत्रपती शिवराय ही आपली प्रेरणा आहे, शक्ती आहे. म्हणून शिवाजी महाराजांना आपल्या हृदयात बसवा. इतिहास वाचण्यापेक्षा तो अभ्यासणं आणि जाणून घेणं हे अधिक महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीत वाढलेले आणि राजमाता जिजाऊंच्या संस्कारात वाढलेेले छत्रपती संभाजी यांचं शौर्यतेज प्रकट होत गेलं. त्यांच्याविषयीचा खोटा इतिहास प्रसारीत झाला हे आपलं दुर्देवं म्हणावं लागेल. म्हणून संपूर्ण मराठ्यांचा इतिहास जाणून घेताना या व्यक्तीरेखांना भावनिक पातळीवर समजून घ्या. हे जाणण्यासाठी महेश गुप्ते लिखित स्वराज्यसाक्षी आणि शिक्केकट्यारी ही पुस्तके दीपस्तंभ ठरतील, असे वक्तव्य ज्येष्ठ व्याख्याते ह.भ.प. यशवंत उर्फ बाबूराव कानडे यांनी केले.
व्यास क्रिएशन्स्तर्फे महेश गुप्ते लिखित शिक्केकट्यारी आणि स्वराज्यसाक्षी तसेच ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरकर लिखित श्रीमहाभारत या पुस्तकांच्या ऐतिहासिक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ लेखक आणि नाटककार अशोक समेळ, संत साहित्याचे गाढे अभ्यासक वामनराव देशपांडे, व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक श्री. वा. नेर्लेकर, व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वामनराव देशपांडे म्हणाले, महर्षी व्यासरचित श्रीमहाभारत हे महाकाव्य हा एक विश्वचमत्कार आहे. या महाकाव्याला आता पाच हजार वर्षे उलटून गेली. पण त्याची अलौकीकता जराही कमी झाली नाही. जगभरातल्या विद्वानांना या महाकाव्याच्या अभ्यासाची भुरळ पडली. ही सूड कथा नाही,तत्त्वज्ञानाला मोहिनी घालेल अशी भगवद्गीता यात प्रकट झाली आहे. मानवी आयुष्यावर चांदणं बरसवणार्या महाभारताला पर्याय नाही. आजच्या पिढीसाठी श्रीराम बोरकर यांनी नव्यानं दालन उघडलं आहे याचा वाचकांनी नक्की लाभ घ्यावा. ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ यांनी आपल्या प्रभावी शैलीत आपण लेखक ते नाटककार कसे झालो याचा प्रवास मांडला. एक साधी गोष्ट पण साहित्यात कसा इतिहास घडवून जाते याचे उदाहरणांसह केलेल्या मांडणीमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. श्रीमहाभारत पुस्तक प्रकाशनासाठी बालगणेशाचे आगमन, शिक्केकट्यारी आणि स्वराज्यसाक्षी पुस्तकांच्या प्रकाशनासाठी तडफदार मावळे आणि मराठ्यांच्या सम्राज्ञी यांचा प्रवेश अशा आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे रसिकांनी व्यास क्रिएशन्स्चे विशेष कौतुक केले. व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर आणि समीर गुप्ते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. लेखक महेश गुप्ते आणि श्रीराम बोरकर यांनी पुस्तकनिर्मितीबद्दल मनोगत व्यक्त केले. व्यास क्रिएशन्सचे मुद्रक सुबोध पटवर्धन, चित्रकार अनिल दाभाडे, सुधीर मुणगेकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. हर्षदा बोरकर यांनी सूत्रसंचालन केले.