बदलापूर : बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्वागत कमान उभारावी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज पालिकेत धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी उपस्थित नसल्यान त्यांच्या खुर्चीला मराठा समाजाने निवेदन चिटकवले.
अंबरनाथ आणि बदलापूरच्या सीमेवर बेलवली परिसरात बदलापूर नगरपालिकेची एक लोखंडी स्वागत कमान होती. या कमानीला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले होते. मात्र याठिकाणी उड्डाणपुलाचे काम करायचे असल्याचे सांगत पालिकेने ही कमान हटवली आणि काही अंतरावर पर्यायी सिमेंट काँक्रिटची कमान उभारण्याचे काम सुरू केले. मात्र हे कामही गेल्या ७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत रखडून पडली आहे. रस्त्याच्या मधोमध अर्धवट उभारलेले पिलर्स गेल्या ५ वर्षांपासून सोडून देण्यात आले आहेत.
याबाबत वारंवार मागण्या करून आणि निवेदने देऊनही पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा सकल मराठा समाजाचा आरोप आहे. याचा जाब विचारण्यासाठी आज सकल मराठा समाजाने बदलापूर पालिकेत धडक दिली. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव, भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या मागणीसाठी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता गोडसे हे पालिकेत उपस्थित नव्हते. त्यामुळे पालिकेच्या प्रभारी उपमुख्याधिकारी यांनी निवेदन स्वीकारले. मराठा समाजाने यावेळी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवले. मुख्याधिकारी जेव्हा येतील, तेव्हा त्यांना आधी हे निवेदन मिळेल, असे यावेळी अविनाश देशमुख यांनी सांगितले. तर बदलापूर पालिकेवर मागील ३ वर्षांपासून प्रशासकीय राजवट असून या कालावधीत प्रशासनाने या कमानीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केला. दुसरीकडे फक्त बदलापूर पश्चिमच नव्हे, तर पूर्वेलाही महामार्गावर कार्मेल शाळेसमोर कमान उभारण्याची मागणी संजय जाधव यांनी केली.
दरम्यान, यावेळी अविनाश देशमुख यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. छत्रपती शिवाजी महाराजांची कमान ७ वर्ष पालिकेला उभारता येत नाही, पालिकेचे अधिकारी झोपा काढतात का? असा सवाल त्यांनी केला. तसेच ज्या ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे त्या ठिकाणी इमारतीचे काम सुरू करण्यात आल्याने त्याबाबत देखील आक्षेप नोंदवण्यात आला.