बदलापूर : सर्वोत्कृष्ट योद्धा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासात वर्णन आहे. ते फादर आॅफ इंडियन नेव्ही म्हणजेच नौदलाचे पिताश्री आहेत असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांनी बदलापूर येथे सकल मराठा महोत्सवाच्या कार्यक्र मात काढले.शौर्य, तेज ज्याच्या अंगी एकवटले आहे असे महाराज होते. दक्षपणा आणि बुद्धिमता, युद्धातून पलायन न करण्याची वृत्ती त्यांच्यात होती. धर्म याचा अर्थ हिंदू , बौद्ध, ख्रिश्चन असा नाही तर धर्म म्हणजे आपण जे कार्य अंगिकारले असते त्याला धर्म म्हणतात. एखादा शिक्षक असेल तर शिकवणे हा त्याचा धर्म, सैनिक असेल तर लढणे हा त्याचा धर्म, अभिनेता असेल तर अभिनय करणे याला धर्म म्हणतात, असे त्यांनी सांगितले. कष्ट हे प्रत्येक क्षेत्रात करावेच लागतात.नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट वंशज असलेले डॉ. शीतल मालुसरे यांनी उपस्थितांना राजमालेचे मनोभावे दर्शन घडवले. ही राजमल राजगडाच्या पायथ्याशी त्यांच्या देहावर ठेवण्यात आली होती असे डॉ. मालुसरे यांनी सांगितले. या कार्यक्र मासाठी अभिनेत्री जान्हवी किल्लेदार, जॉनी रावत, विजया पालव उपस्थित होते.मराठा महोत्सवाच्या वतीने तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्य, शिवव्याख्यान, मराठी स्वरांचे सुवर्ण पर्व आदी कार्यक्रम झाले. हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी राजू लाड, संभाजी शिंदे, एकनाथ शेलार, अरूण सुरवळ, कालिदास देशमुख, अरूण चव्हाण, संतोष रायजाधव, राजेंद्र चव्हाण, अविनाश देशमुख, मनोज जाधव, सुहास पोखरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
'छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने भारतीय नौदलाचे पिताश्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 11:20 PM