लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून फोटोसेशन केल्याने अपवित्र झालेल्या महाराजांचे शुद्धीकरण करण्याकरिता शिवसेनेने मंगळवारी चक्क पुतळ््याला दुग्धाभिषेक घातला. शिवाजी महाराजांचा आयलानी यांनी अवमान केला असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली.महापालिका स्थायी समिती सभापतीपदी साई पक्षाच्या कंचन लुंड निवडून आल्या. प्रथेप्रमाणे मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला नवनिर्वाचित सभापती लुंड यांच्यासह महापौर मीना आयलानी व इतर नगरसेवकांनी पुष्पमाला अर्पण केली. त्यावेळी कुमार आयालनी यांनी उपमहापौर व साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांच्यासोबत महाराजांंच्या पुतळयाला हार अर्पण केला. पुतळ््यासोबत दोघांनी फोटोसेशन करून घेतले. त्यावेळी आयलानी यांचा हात चक्क शिवाजी महाराजांंच्या खांद्यावर होता. भाजपातील आयलानीविरोधी गटाने हा फोटो सोशल मीडियावर प्रसारित करुन शिवसेनेच्या हाती कोलीत दिले. शिवसेनेसह मनसेच्या नेत्यांनी हा फोटो पाहिल्यावर आयलानी यांचा निषेध केला. मंगळवारी दुपारी ३ वाजता शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ नेते नाना बागुल, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, राजेंद्र शाहू, नगरसेवक शेखर यादव, नगरसेविका ज्योत्स्ना जाधव, ज्योती माने यांच्यासह शिवसैनिक व नगरसेवकांनी महापालिकेत जाऊन दूधाने महाराजांच्या पुतळ््याचे शुद्धीकरण केले. यावेळी आयलानी यांचा निषेध करणारी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. त्यानंतर महाराजाच्या पुतळयाचे शुध्द दुधाने शुघ्दीकरण केले. यापूर्वी मराठी भाषेबद्दल आयलानी यांनी अपशब्द काढले होते व मनसेने कार्यालयावर हल्लाबोल करून ठिय्या आंदोलन केले होते. आयलानी यांनी पुन्हा असा प्रकार केल्यास त्यांना धडा शिकवू. आयलानी यापूर्वी आमदार राहिले असून त्यांच्या पत्नी मीना या महापौर आहेत. मात्र त्यांचा वायफळपणा असाच सुरु राहिला शिवसेना आपल्या स्टाईलने त्यांना धडा शिकवेल.- राजेंद्र चौधरी, शिवसेना शहरप्रमुख, उल्हासनगर
शिवसेनेकडून छत्रपतींचे शुद्धीकरण
By admin | Published: May 31, 2017 5:57 AM