प्रज्ञा म्हात्रे ठाणे : येत्या शुक्रवारी ५ मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून जाणार असल्याने होणारे छायाकल्प ( मांद्य ) चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, शुक्रवारी ५ मे रोजी रात्री ८ वाजून ४४ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणा-या विरळ छायेत येण्यास प्रारंभ होईल, रात्री १० वाजून ५३ मिनिटांनी तो जास्तीत जास्त विरळ छायेत ( ग्रहण मध्य ) येईल, उत्तररात्री १ वाजून २ मिनिटांनी चंद्र विरळ छायेतून बाहेर पडेल.
या ग्रहणात पौर्णिमेचे तेजस्वी चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेत आल्याने कमी तेजस्वी झालेले दिसते. या प्रकारच्या चंद्रग्रहणात कोणतेही ग्रहणविषयक धार्मिक नियम पाळायचे नसतात. हे छायाकल्प चंद्रग्रहण संपूर्ण आशिया, आफ्रिका, ॲास्ट्रेलिया येथून दिसणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.