ठाणे: यावर्षी रविवार २४ मार्च रोजी सायं. होळी पौर्णिमा साजरी करावयाची आहे. होलिका प्रदीपन विधी करायचा आहे. धूलिवंदनाच्या दिवशी सोमवार २५ मार्च रोजी सकाळी १०-२१ पासून दुपारी ३-०५ पर्यंत छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे होळीच्या रंगाच्या उत्सवावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवतीच्या विरळ छायेतून जातो त्यावेळी छायाकल्प चंद्रग्रहण होते. या ग्रहणाच्या वेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात नसल्याने हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. तसेच छायाकल्प चंद्रग्रहणात ग्रहण विषयक कोणतेही धार्मिक नियम पाळावयाचे नसतात. त्यामुळे होळीपौर्णिमेचा रंगोत्सव सर्वांनी आनंदाने साजरा करायला हरकत नाही.
फाल्गुन पौर्णिमेनंतर लगेच फाल्गुन अमावास्येला सोमवार ८ एप्रिल रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहणही भारतातून दिसणार नाही. या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती अमेरिकेतून दिसणार आहे. त्यामुळे जगातील अनेक खगोल अभ्यासक हे खग्रास सूर्यग्रहण पहायला अमेरिकेत जाणार आहेत. स्वत:. सोमणही हे खग्रास सूर्यग्रहण पहायला अमेरिकेत जाणार आहेत. त्यावेळी ते ह्यूस्टनला नासालाही भेट देणार आहेत.
खग्रास सूर्यग्रहणात सूर्याचे विलोभनीय दर्शन होते. याविषयी बोलताना ते म्हणाले की “ शॅडो बॅन्डस्, बेलीज़ बीडस्, करोना आणि खग्रास स्थितीच्या वेळी दिवसा पडणा-या अंधारात बुध, शुक्र , तारकांचे दर्शन खूपच सुंदर असते. १९८०. १९९५ मध्ये भारतातून दिसलेली खग्रास सूर्यग्रहणे आपण पाहिली होती. १९९९ आणि २००९ मध्ये भारतातून दिसणारी खग्रास सूर्यग्रहणे झाली होती, परंतू आकाश अभ्राच्छादित राहिल्याने ती दिसली नव्हती. यापुढे भारतातून दिसणारे खग्रास सूर्यग्रहण २०३४ मध्ये होणार आहे “