मीरा रोड : मीरा- भार्इंदरमधील रस्ते, पदपथ अडवून बसणारे बेकायदा फेरीवाले आणि बेकायदा पार्किंगवर पालिका आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी लोकशाही दिनात दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदार सजी पापाचन यांनी केला आहे. काही फेरीवाला पथक कर्मचारी , पालिका अधिकारी तसेच काही नगरसेवकांचे फेरीवाल्यांकडून हप्ते बांधलेले आहेत. बेकायदा पार्किंग प्रकरणातही बार, हॉटेल, कार विक्रेतेंकडून हप्ते मिळत असल्याने कारवाई होत नसल्याचे सजी यांनी म्हटले आहे.मीरा- भार्इंदर शहरात बेकायदा फेरीवाले आणि बेकायदा पार्किंगची समस्या अतिशय ज्वलंत बनली आहे. शहरातील जवळपास सर्वच मुख्य व अंतर्गत रस्ते, पदपथ हे बेकायदा फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. ‘ना फेरीवाला क्षेत्रा’तही सर्रास फेरीवाले बसतात. यामुळे रस्ते व पदपथांवरील अतिक्रमण पादचारी तसेच वाहनधारकांना अत्यंत त्रासदायक ठरत आहे.एकीकडे फेरीवाला धोरण बनवले जात नसतानाच दुसरीकडे नागरिकांचा सर्वप्रथम हक्क असलेले रस्ते व पदपथ फेरीवाल्यांनी व्यापल्याने रहदारीला अडथला होत आहे. वाहतूक कोंडी तर पाचवीला पुजली असून यातून ध्वनी व वायू प्रदूषण होऊन इंधनही वाया जात आहे. बेकायदा फेरीवाल्यांविरोधात रहदारीला अडथळा होत असल्याने यातून वाद होतात. काही प्रकरणांमध्ये तर हाणामारीचे प्रसंगही घडले आहेत. पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल झाले आहेत.फेरीवाल्यांच्या विविध संघटना, स्थानिक राजकारणी व नगरसेवकांचा आशीर्वाद व पालिकेच्या फेरीवाला निर्मूलन पथकासह अनेक अधिकाºयांचे पाठबळ असल्याने फेरीवाले मोकाट आणि मुजोर झाले आहेत. अनेक नगरसेवक, पालिका कर्मचारी, अधिकारी आदींना हप्ते बांधलेले असल्यानेच फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही. वाहतूक पोलीसही सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप साजी यांनी केला आहे. फेरीवाल्यांकडून दीड ते तीन हजारापर्यंत महिना हप्ता बांधला गेल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.फेरीवाल्यांसह रस्त्यावर उभ्या केल्या जाणाºया बेकायदा वाहन पार्किंगचा मुद्दाही त्यांनी हाती घेतला आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर बेकायदा पार्किंग होत असून यामुळेही वाहतूक कोंडी होऊन रहदारीला अडथळा येतो. परंतु वाहतूक पोलीस, पालिका हे या बेकायदा पार्किंगविरोधात कारवाई करत नाही. नो पार्किंग असूनही बार, हॉटेल, कार व दुचाकी विक्रेते यांचे हप्ते बांधलेले असल्याने त्या ठिकाणी बेकायदा उभ्या केल्या जाणाºया गाड्यांवर कारवाईच होत नाही. रस्ते व पदपथावरील बेकायदा फेरीवाला व बेकायदा पार्किंग हटवण्यासाठी आपण सातत्याने महापालिका, पोलीस प्रशासन यांच्याकडे तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या लोकशाही दिनात या बद्दल तक्रार केली होती. १२ जूनला मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या लोकशाही दिनात स्वत: ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील व पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी मीरा- भार्इंदरमधील रस्ते, पदपथ अडवून बसलेल्या फेरीवाले तसेच बेकायदा पार्किंगवर कारवाई करु असे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले होते.थातूरमातूर कारवाईचे नाटकचार महिने उलटले तरी महापालिका व पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांना लोकशाही दिनात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे बेकायदा फेरीवाला आणि बेकायदा पार्किंग विरुध्द कारवाईच केली जात नसल्याचा आरोप साजी यांनी केला आहे.एखादी थातूरमातूर कारवाई केल्याचे नाटक प्रशासनाकडून केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनाच जर पालिका आणि पोलीस जुमानत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न त्यांनी केला आहे. प्रशासन वादात पडले आहे.
चक्क मुख्यमंत्र्यांनाही गुंडाळले , पालिका, पोलिसांचे आश्वासन हवेत, बेकायदा फेरीवाले, पार्किंगला सर्रास अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 6:10 AM