डोंबिवली : विरोधकांकडे बोलायला वक्ते नसल्याने भाड्याने वक्ते घेतले जात आहेत. सध्या रेल्वेचे इंजिन असेच भाड्याने घेतले आहे. तोंडाच्या वाफेवर इंजिन चालत नाही, त्यासाठी ताकद लागते, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून केली.
फडणवीस म्हणाले की, सध्या काहीच काम नसल्याने रात्रभर ते इंटरनेटवर असतात. ते रोज व्हिडीओ दाखवत आहेत आणि आम्ही त्यांची पोलखोल करत आहोत. यू-ट्युबवरचे व्हिडीओ खरे नसतात, हे त्यांना कोणीतरी सांगावे. लोकांनी तुमचा व्हिडीओ पाहून तुम्हाला घरी पाठवले. तुम्ही कोणालाही आणा, महायुती यशस्वी होणारच, असा टोला त्यांनी लगावला. फडणवीस म्हणाले, याठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. परंतु, त्या पक्षाने निवडणूक केव्हाच सोडून दिली आहे. शरद पवार यांनी आधी जाहीर केले की, लोकसभा लढणार नाही. मात्र, लोकसभेला पुन्हा तयार झाले. मात्र, नरेंद्र मोदी यांची गुगली बघून मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला. जर साहेबांची ही अवस्था तर चेल्यांचे काय? इथल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला किती मतांनी हरवायचे, याचीच उत्सुकता बाकी आहे. दरम्यान, सभा सुरू असताना मनसेने पूर्वेतील फडके रोडवरील आपल्या कार्यालयाजवळ मोदी सरकारच्या निषेधार्थ फुगे हवेत सोडले.