अजित मांडके, ठाणे : स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांच्या काळापासून नववर्ष स्वागतार्थ सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:ही रक्तदान करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. दिघे साहेबानी घालून दिलेली शिकवण पुढे नेण्यासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मद्यधुंद होऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याऐवजी रक्तदान करून नवीन वर्षाचे स्वागत करावे असा संदेश त्यांनी आजच्या तरुणाईला दिला.
ठाणे शहरात दरवर्षी मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर आणि राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. शिवसेना ठाणे शहर शाखा आणि रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गेली २९ वर्ष या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात येते. यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक रक्तदात्यांनी या कार्यक्रमात रक्तदान केले.
या रक्तदात्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते रक्तानंद पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच या क्षेत्रात काम करणारे अन्य मान्यवर संस्था आणि व्यक्तींचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात काही दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव आणि साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण जगभरात आशा पद्धतीने नववर्षाचे स्वागत करणारा असा हा एकमेव कार्यक्रम असून गेली २९ वर्षे हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे आपण म्हणतो, रक्तदान शिबीरे आणि शिवसेनेचे अतूट असे नाते आहे. ज्या ज्या वेळी कधीही रक्ताचा तुटवडा जाणवला त्या त्या वेळी शिवसैनिक कायमच मदतीसाठी पुढे धावून आला आहे. काही वर्षापूर्वी नवरात्रीचे नऊ दिवस याच मैदानात भव्य असे महारक्तदान शिबिर आपण आयोजित केले होते. त्या शिबीरात ११ हजारहुन अधिक दात्यांनी रक्त जमा करून एक आगळा वेगळा विक्रम केला होता. आज नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेक तरुणांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान केले याचे विशेष समाधान वाटत असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच या सोहळ्यात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आणि संस्थांचे डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष आभार मानले. तसेच या रक्तदान करणाऱ्या ठाणे शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा दिनदर्शिकांचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी यादौऱ्यात वर्षाच्या स्वागतानिमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबईसह महाराष्ट्रात सध्या डीप क्लिन ड्राइव्ह सुरू असून सुंदर शहरे स्वच्छ शहरे हरित दौऱ्यात ही संकल्पना आपण राबवत आहोत. त्याचे सकारात्मक परिणाम आता शहरात जागोजागी दिसू लागले आहेत. आता हे अभियान राज्यभरात राबविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ गेट वे ऑफ इंडियावर करण्यात आला. मुंबईत आज १० ठिकाणी डीप क्लिन ड्राइव्ह मोहीम राबविण्यात आली असून त्या मोहिमेशी १ लाख नागरिक प्रत्यक्ष जोडले गेले होते. आपण हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवत असून त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. जे लोक त्यावर फोटोसेशन केल्याची टीका करतात त्याना एवढेच सांगायचे आहे की हे फोटोसेशन नसून स्वच्छता मिशन आहे.
22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिर सकारले जात असून स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांच्यासह करोडो रामभक्तांचे स्वप्न सकार होत आहे.. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होत आहे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. स्वर्गीय दिघे साहेबानी कारसेवेत सहभागी होऊन ठाणे शहरातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. त्यामुळे या मंदिराचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
आगामी वर्षही केवळ महाराष्ट्राचे:
तसेच गेल्या दीड वर्षात सरकारने प्रत्येक निर्णय सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. मी स्वतः देखील सीएम म्हणजे कॉमन मॅन बनून जमेल तेवढी लोकांची सेवा करतो आहे. परदेशी गुंतवणुकीत राज्याने कर्नाटक गुजरातला मागे टाकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवला आहे. अनेक उद्योजक आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आजही महराष्ट्राला पहिली पसंती देत आहेत. गतवर्षी दाओसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींचे एमओयु केले गेलेले त्यातील ८५ टक्के एमओयुनुसार काम सुरू झाले असून यंदाही राज्यात विक्रमी गुंतवणूक घेऊन येऊ असे यावेळी बोलताना सांगितले.
केंद्रात आणि राज्यात डबल इंजिनचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे राज्याचा वेगवान विकास करणे शक्य होते आहे. याक्षणी सर्वाधिक विकासप्रकल्प हे महाराष्ट्रात सूर आहेत. त्यामुळे आगामी वर्ष देखील महाराष्ट्राचेच असेल असा आशावाद यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटीका मीनाक्षी शिंदे, शिवसेना ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, माजी परिवहन सभापती विलास जोशी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, टेम्भी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार आणि ठाणे शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि रक्तदाते यावेळी आवर्जून उपस्थित होते.