उल्हासनगर : रिजेन्सी अंटेलिया येथील महापालिका रुग्णालयाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. तर कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांची सोमवारी एल्गार परिषद सभेचे आयोजन केले आहे. दोन्हीकडून शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
उल्हासनगर महापालिकेने कोरोना काळात कॅम्प नं-१ येथील रिजेन्सी-अंटेलिया येथील २०० बेडचे रुग्णालय उभारून ११ कोटी पेक्षा जास्त किमतीचे साहित्य व मशीन घेतले होते. गेली दोन वर्षे उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेले महापालिका रुग्णालय अचानक खाजगी ठेकेदारला देण्यात आले असून शहरवासीयांसाठी कॅशलेस काउंटर रुग्णालय राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले. अखेर महापालिका रुग्णालयाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी ५ वाजता राहणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. यावेळी बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर उपस्थित राहणार आहेत.
कॅम्प नं-५ येथील दसरा मैदान येथे सोमवारी दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांची एल्गार परिषद सभेचे आयोजन केल्याची माहिती पक्षाचे नेते महेश तपासे यांनी दिले. सोमवारी दुपारी साडे चार वाजता बिर्ला स्कूल कल्याण पश्चिम येथे हेलिकॉप्टरने आगमन होणार असून स्प्रिंग टाइम क्लब खडकपाडा कल्याण पश्चिम येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट व स्वागत होणार आहे. त्यानंतर उल्हासनगरला येणार असून नेताजी चौकात कार्यकर्त्यांकडून स्वागत होणार आहे. त्यानंतर सभे ठिकाणी जाणार आहेत. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार शहरात येत असल्याने, ते काय बोलणार याकडे सर्वांचें लक्ष लागले आहे.