मुंबई - राज्यात आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून शिंदे गट- भाजपाने माघार घेतली असली तरी मुंबईसह राज्यातील पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला उत येणार आहे. अशातच एकनाथ शिंदे सरकारला ४ महिने झाले तरी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. पहिल्या विस्तारात संधी न मिळाल्याने शिंदे गटात आलेल्या अनेकांचा हिरमोड झाला होता, ते आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत आता शिंदे गटाचे नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. तसेच, ५० खोकेंच्या मुद्द्यावरुनही विरोधकांना टोला लगावला.
विरोधक 50 खोके घेतल्याचा आरोप करत असताना. आता मला मुख्यमंत्र्यांनी ९०० खोके दिले आहेत, याचा मला आनंद आहे. मुख्यमंत्र्यांनी विकास कामांकरता मला निधी दिला. मीरा भाईंदर आणि ओवळा माजीवाड मतदार संघात एकूण १८०० कोटी रुपये दिले आहेत, असेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले. तसेच, ५० आमदारांच्या गुवाहटी ट्रीपबाबतही त्यांनी माहिती दिली. कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण २६ तारखेला जाणार आहोत. २७ तारखेला अनेक लग्न असल्यामुळे २६ तारेखाबाबत सर्व आमदार आग्रही आहेत, असेही सरनाईक यांनी सांगितले.
मंत्रीमंडळ विस्तार मुख्यमंत्री ठरवतील
यापूर्वी आम्हाला मागावे लागत होते, आता समोरून मिळत आहे. त्यामुळे आम्ही सर्व आमदार खुश आहोत. मंत्रिमंडळ पद मिळेल की नाही, ही नंतरची गोष्ट आहे. मात्र, मुख्यमंत्री विकास कामासाठी निधी देत आहेत, यातच समाधानी असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं.
मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही
खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पडणार असून राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार असून त्यासाठी तयार रहा असे आवाहन त्यांनी केले होते. सरनाईक यांनी राऊत यांचे विधान खोडून काढले असून हे सरकार चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता नसून सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. हे सरकार स्थापन होत असताना कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी देवीच्या दर्शनासाठी पुन्हा येणार असल्याचे साकडे घातले होते. त्यामुळे पुन्हा देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचेही सरनाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरनाईक यांनी विरोधकांवरही टीका केली. विरोधक ५० खोक्यावरून नेहमी टीका करत असताना मात्र विरोधकांच्याच भाषेत बोलायचं झालं तर मला तर मुख्यमंत्र्यांनी ९०० खोके दिले असून ते माझ्या मतदार संघातील विकासकामांसाठी दिले असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण २० मंत्री आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. ९ शिंदे गटाचे आणि ९ भाजपाचे मंत्री आहेत. एनबीटीच्या वृत्तानुसार शिंदे सरकारच्या सूत्रांनी हा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार सध्यातरी दिसत नाही. या ऐवजी नाराज आमदारांकडे महामंडळांची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे या आमदारांची नाराजी देखील दूर होईल आणि अध्यक्षपदे मिळाल्याने ते कामालाही लागतील, असा शिंदे-फडणवीस सरकारचा प्लॅन असण्याची शक्यता आहे.