ठाणे - मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंनीदहीहंडी उत्सवात अगदी कार्यकर्त्यांसारखा सहभाग घेतल्याचं दिसून आलं. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील विविध दहीहंडी महोत्सवांना त्यांनी हजेरी लावली. यावेळी, गोविंदा बद्दल सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. तसेच, हिंदू सणांवरील निर्बंध आपण उठवले असून हे सण मोठ्या उत्साहात साजरे करा. आता दहीहंडी झाल्यानंतर गणपती आणि नवरात्री उत्सवही जल्लोषात साजरा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे, सगळीकडेच मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
ठाणे शहरातील विविध दहीहंडी उत्सवानांना, टेंभीनाका येथेही आवर्जून उपस्थिती, भिवंडी असेल, दहिसर, मागाठाणे, घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवांना हजेरी लावली. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव डोंबिवलीत रात्री 11.30 वाजता त्यांनी दहीहंडी उत्सवात उपस्थित राहत आपल्यातील कार्यकर्त्याचं उदाहरण दिलं. कारण, येथे पोहोचण्यासाठी त्यांनी रिस्क घेत चक्क बोटीतून प्रवास केला. डोंबिवली पश्चिमेकडे सम्राट चौकामध्ये फाउंडेशन तर्फे दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता या उत्सवाला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली.
मानकोली वेलेगाव ते डोंबिवली मोठा गाव गणेश घाटापर्यंत रात्री साडे अकरा वाजता एकनाथ शिंदे यांनी बोटीनं प्रवास करत कार्यक्रम स्थळ गाठलं. बोट चांगली होती म्हणून सुरक्षित पोहोचलोय. खरं म्हणजे कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहापुढे शेवटी नेत्याला देखील यावंच लागतं, अशी मिश्कील प्रतिक्रियाही यावेळी त्यांनी दिली. कार्यक्रमास मुख्यमंत्री येणार असल्याने डोंबिवली शहरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच डोंबिवलीत गेले होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकनाथ शिंदेंचं जोरदार स्वागत देखील करण्यात आलं. मुख्यमंत्री शिंदे यांचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे आणि माजी नगरसेवक तथा महोत्सवाचे आयोजक दिपेश म्हात्रे यांनी पुष्पगुच्छ आणि शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.
दोन वर्षानंतर दहीहंडी उत्सव होत असून सरकारने देखील पूर्णपणे मोकळीक दिली आहेय अत्यंत उत्साहात सण साजरा होतोय याचं मला समाधान वाटतंय, आनंद होतोय, मी ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी प्रचंड उत्साह दिसून येतोय, असे एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे बोलताना, हे सरकार तुमचं आमचं सगळ्यांचं सरकार आहे. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, हे शिवसेना भाजपा युतीचं सरकार आहे. प्रत्येकाला वाटतं हे माझं सरकार आहे. आपलं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, हा फरक या गोविंदा उत्सवांमध्ये पाहायला मिळतोय, अनुभवला मिळतो ही चांगली बाब असल्याचंही ते म्हणाले.