ठाणे : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मागील आठ ते दहा दिवसापासून होणाऱ्या वाहतूक कोंडीची अखेर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी फोन करुन ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीची बैठक घेऊन समस्या सोडविण्यासाठी पावले उचलावीत, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता जिल्हाधिकारी देखील त्या कामाला लागले असून वाहतूक कोंडीचा अभ्यास करुन ती सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
सतत पडत असलेला पाऊस आणि रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे शुक्रवारी देखील मुंबई- नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. साकेत ते रांजनोली, साकेत ते माजिवडा जंक्शन, मुंब्रा बायपास आणि शिळफाटा येथे वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. साकेत पुलावर, पुढे खारेगाव टोलनाक्यावर पडलेल्या खड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे दिसून आले आहे. तसेच मुंब्रा बायपासवर देखील खड्डे पडले असून माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथील रस्त्यांच्या पाहणी केली होती. या पाहणीत बायपासवर मोठ मोठे खड्डे असल्याचेही निर्दशनास आले आहे. त्यामुळे या भागात आणि शिळफाटा मार्गावरही वाहतुक कोंडी होतांना दिसत आहे.
या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा थेट ठाण्यात कॅडबरी ते नितीन कंपनी र्पयत जातांना दिसत आहेत. त्यामुळे ठाणेकरांचेही हाल होत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना पाच ते सात मिनिटाचे अंतर कापण्यासाठी एक ते दीड तासांचा कालावधी जात होता. त्यात शुक्रवारी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला देखील दिवा ते ठाणे हे अंतर कापण्यासाठी तब्बल तीन तासांचा कालावधी लागल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना फोन करुन यावर तातडीने तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत जिल्ह्यातील संबधींत यंत्रणाची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.