ठाणे - जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करुन, विविध सामाजिक उपक्रम राबवत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनीही मध्यरात्रीच जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या वर्षात विकासाचं पर्व सुरु व्हाव, राज्यातील शेतकरी समाधानी व्हावा, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होत, स्वत: रक्तदान करत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. ठाण्यातील जांभळी नाका शिवाजी मैदान येथे रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमात ते उपस्थित होते.
दिवंगत आनंद दिघे यांनी रक्तदान शिबीर सुरु केले होते. यावेळी बोलताना, रक्तदान हे जीवनदान आहे. न चूकता काहीजण रक्तदान करत असतात. सर्व रक्तदात्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी रक्तदात्यांचे आभारही मानले. रक्त हे बनवता येत नाही, त्याला रक्तदानच करावं लागतं पोलिस, जवान, महिला देखील या रक्दानाच्या उपक्रमात सहभागी होतात. आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा रक्तदानाचा उपक्रम खूप महत्वाचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनाच्या संकटात आपण याच ठिकाणी रक्तदानाचा विक्रम केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावेळी रक्तदान केलं. आनंद दिघे याच्या संकल्पनेतून नवीन वर्षाची सुरुवात ही रक्तदानपासून करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना काळात याच ठिकाणी 11 हजाराहून अधिक जणांनी रक्तदान केलं होतं. याचा अनेक रुग्णांना फायदा झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
नववर्षाच्या स्वागतार्थ दिवंगत आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात येते. या रक्तदान शिबिरास उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांनी रक्तदान केले. तसेच जमलेल्या रक्तदात्या बांधवांचे सन्मानपत्र देऊन कौतुक करीत अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, बाळासाहेबांची_शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक, प्रवक्ते आणि माजी महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर सौ.मिनाक्षी शिंदे उपस्थित होते.