भार्इंदर- भार्इंदर पुर्व-पश्चिमेला जोडणारा व एकमेव उड्डाणपुलाला पर्याय ठरणारा बहुप्रतिक्षित भुयारी वाहतूक मार्गाचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मीरारोड रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभिकरण प्रकल्पाचे त्यांच्याच हस्ते भूमीपुजन करण्यात आले.
त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हि भार्इंदरकरांना दिवाळीची भेट असल्याचे सांगितले. भुयारी मार्गासाठी पालिकेने अनेकदा निविदा काढुनही अखेरच्या ८ व्या निविदाकाराला काम देण्यात आले. हा मार्ग किती आवश्यक होता, हे ऐन दिवाळीतही मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांमुळे हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. या मार्गाचे लोकार्पण झाल्याचे जाहिर करुन त्यांनी मीरारोड रेल्वे स्थानक परिसराच्या भूमीपुजनही केले.
मीरारोड रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणात त्याच्या दर्शनीभागाचे काम पुर्ण झाले असुन चारमजली एलिव्हेटेड पार्कींगच्या इमारतीचे काम अपुर्णावस्थेत आहे. त्या प्रस्तावाला पालिकेतील आघाडी सत्ताधाऱ्यांच्या काळात मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी एकुण २२ कोटींचा खर्च गृहित धरण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्याचे भूमीपुजन काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या हस्ते २०१४ मध्येच करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याच प्रकल्पाचे दुसऱ्यांदा भूमीपुजन केल्याने तो राजकीय वर्तळात चर्चेचा विषय बनला.