सदानंद नाईक उल्हासनगर : दिवाळीपूर्वी शहर विकास आराखडयाला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न पाळल्याने महापौर मीना आयलानी यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी तोंडघशी पडले. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा फक्त आश्वासन दिले आहे.महापालिकेवर भाजपासह मित्र पक्षाची सत्ता येण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिका निवडणुकीच्या दरम्यान शहर विकास आराखडा मंजुरीसह अनेक आश्वासने नागरिकांना दिली होती. भाजपाचे मित्रपक्ष साई व ओमी टीमने शहर विकास आराखडयासह इतर विकासात्मक पॅकेजबाबत महापौर आयलानी यांच्याकडे तगादा लावला. तसेच आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांना विसर पडल्याची टीका शहरातून सुरू झाली आहे.महापौर आयलानी व पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्र्याची सहा महिन्यात तीनवेळा भेट घेतली. तसेच त्यांच्या समोर निवडणुकीतील आश्वासनांचा पाढा वाचून शहर विकास आराखडयासह वाढीवपाणी योजना, विशेष पॅकेज, रस्ता रूंदीकरणातील बाधित व्यापाºयांचे पुनर्वसन, नगररचनाकार आदी अनेक प्रस्तावांना लवकरच मंजुरी देण्याची विनंती केली. गेल्याच महिन्यात नगरविकास विभागाच्या सचिवांकडे बैठक घेऊन शहरातील विविध समस्या मांडल्या. त्यानींही उत्साहाच्या भरात दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री शहर विकास आराखडयाला मंजुरी देणार असल्याचे सांगितले.दिवाळी संपल्यानंतरही आराखडयाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली नाही. याप्रकाराने महापौरांसह मित्र पक्षात नाराजी पसरली आहे.मात्र नाराजी कोणीही उघडपणे व्यक्त करत नसल्याने, भाजप मित्रपक्षात असंतोष खदखदतो आहे. शुक्रवारी महापौर, कुमार आयलानी यांनी दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. त्याभेटीत त्यांनी पुन्हा जुन्या मागण्यांची आठवण करून दिली. एका महिन्यात शहर विकास आराखडयासह इतर प्रस्तावांना मंजुरी देणार असल्याचे आश्वासन महापौरांना दिले.>...तर भाजपाला धक्कापक्षात अशीच नाराजी निर्माण झाल्यास भाजपाला झटका बसणार असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पक्षातील निष्ठावंत गटही शहर विकास ठप्प पडल्याने नाराज आहे. एकूणच वरिष्ठांच्या आश्वासनपूर्ती अभावी शहर भाजपासह मित्र पक्षात नाराजी पसरली आहे.
मुख्यमंत्र्यांनाच आश्वासनांचा विसर, भाजपासह मित्रपक्ष नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 4:04 AM