लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पोलिसांना हाताशी घेऊन हा बंद करण्यात आला आहे. हा बंद म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. मोर्चा निघणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्था, वाहतूककोंडी होणार नाही, यासाठी पोलिसांना सूचना देणे गरजेचे होते. पण, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रिक्षाचालकांना मारहाण होत असेल, बस बंद केल्या जात असतील तर ही दडपशाही आहे. मुंबईतील महामाेर्चा दडपण्यासाठीच हा बंद घडवून आणला. ते मुख्यमंत्री आहेत की व्हाइसरॉय आहेत, असा प्रश्न पडला असल्याचेही आव्हाड म्हणाले.
महापुरुषांचा वारंवार केला जाणारा अवमान, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी, राज्यातील बेरोजगारी याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महामोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी आनंदनगर चेकनाका येथून राष्ट्रवादीचे सुमारे पाच हजार पदाधिकारी, वारकरी मुंबईच्या दिशेने बसने रवाना झाले. तेव्हा आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ठाण्याहून हजारो लोक मुंबईला निघाले आहेत. त्यांच्या मनात आक्रोश आहे. सरकारमधील नेतेमंडळी महापुरुषांबद्दल करत असलेले अवमानजनक वक्तव्य याविराेधात हा आक्रोश आहे, असे ते म्हणाले. ठाण्यात बंद पुकारून परिवहन सेवा बंद ठेवून, रिक्षाचालकांना दमदाटी करून नागरिकांना वेठीस धरण्यात आले. त्यांनी वारकऱ्यांसाठी हा संप केलेला आहे. पण खुद्द वारकरी हे आमच्यासोबत आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला. ९ वर्षांपूर्वीचे पुराण काढण्याचा हा प्रकार असून त्यांचे हे नवीन नाटक असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी उपस्थित वारकऱ्यांना ठाणे बंदविषयी छेडले असता, त्यांनी सर्व बनावट आहे. आम्हीही वारकरी आहोत. पिढ्यानपिढ्या वारकरी परंपरा जपत आहोत, असे सांगितले. यावेळी आव्हाड यांनी त्या वारकऱ्यांसमाेर नतमस्तक होऊन त्यांचे धन्यवाद मानले.