ठाणे : टेंभी नाक्यावरील देवीच्या आगमन सोहळ्यात सोमवारी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे एकमेकांसमोर उभे टाकल्याचे चित्र दिसून आले. दोघेही देवीचा रथ ओढताना दिसून आले, त्यामुळे मागील काही दिवस एकमेकांवर चिखल फेक करणारे हे दोघेही देवीच्या आगमन सोहळ्या निमित्ताने का होईना एकत्र आल्याचे दिसून आले. दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात आले.
आमदार शिंदे यांच्यासोबत जात असताना १२ खासदार देखील त्यांच्यासोबत गेले. ठाणे जिल्ह्यातही त्याचे पडसाद दिसून आले. शिंदे गटात ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी प्रवेश केला. मात्र उद्धव ठाकरे गटातील ठाण्यातील खासदार राजन विचारे हे मात्र शिंदे गटाबरोबर गेले नाहीत. त्यामुळे ठाण्यात शिंदे विरुद्ध राजन विचारे असा सामना सुरू झाला. त्यानंतर गुरुपौर्णिमा असेल स्वर्गीय आनंद दिघे यांची जयंती असेल स्वातंत्र्य दिनाचा औचित्य असेल यावेळी राजन विचारे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद दिसून आले.
मात्र सोमवारी देवी आगमन सोहळ्याच्या निमित्ताने शिंदे आणि विचारे हे एकत्र आल्याचे दिसून आले. हे दोघेही देवीचा रथ ओडताना दिसत होते. त्यांच्यासमवेत केदार दिघे सुद्धा होते. तसेच शिंदे गटातील इतर पदाधिकारी हजर होते. मात्र यावेळी कोणतीही राजकीय भाष्य दोघांकडूनही झाले नाही. देवीचा आगमन सोहळा दोघेही आनंदाने साजरा करताना दिसून आले. विशेष म्हणजे नवरात्र उत्सवाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथील सजावटीची पाहणी केली. यावेळी त्यांना प्रश्न केला असता देवी ही सगळ्यांची आहे, त्यामुळे इथे कोणालाही प्रवेश नाकारला जाणार नाही असे स्पष्ट केले होते.