ठाणे : जर ठाण्यातील एखाद्या आंब्याच्या स्टॉलसाठी मुख्यमंत्र्यांकडून फोन येऊ शकतो. तर ठाणे महापालिकेतील नालेसफाईतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणीही आ. संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे करावी, असे आवाहन राष्टÑवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी सत्ताधारी भाजपला केले. नालेसफाई ही पावसाळ्यापूर्वीच होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ती तातडीने करण्याची मागणी ३ मे रोजीच पालिका आयुक्तांकडे केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.भाजपचे आमदार केळकर यांनी ठाणे शहरातील नालेसफाईमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या चौकशीचे आव्हान केळकर यांच्यासह पालिका आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना त्यांनी दिले.ते म्हणाले, केळकर हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून आणावेत. जर, आंब्याचा एक स्टॉल हटविण्यासाठी मुख्यमंत्री मध्यस्थी करीत असतील, तर लोकांच्या जीविताशी संबंधित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाच पाहिजे. नाल्यातून निर्माण झालेला पैसा कुठे जातो, हे मुख्यमंत्र्यांनी शोधावे, असे आवाहन आव्हाड यांनी केले.गेली दहा वर्षे आम्ही नालेसफाई व्यवस्थित होण्याच्या उद्देशाने ठामपाशी पत्रव्यवहार करीत आहोत. एकच अधिकारी गेली दहा वर्षे नालेसफाईवर लक्ष ठेवून आहे. नालेसफाईचे काम करणारे ठेकेदार कोणाच्या रोजंदारीवर आहेत; नालेसफाईवर गेली २५ वर्षे सत्तेत असलेले लोक का बोलत नाहीत, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.नालेसफाईसंदर्भात मागील वर्षी ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी मांडलेली लक्षवेधी आजपर्यंत सभागृहात घेण्यात आलेली नाही. याचीही कारणे आता सत्ताधारी आणि प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी आव्हाड यांनी केली.नालेसफाईला यंदाही उशीरजूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठाण्यात पावसाचे आगमन होते. त्याचदरम्यान नालेसफाईला सुरुवात होते. त्यामुळे अर्धी नालेसफाई झाल्याने त्या नाल्यातील कचरा वाहून जातो. बाहेर काढलेला कचराही पावसाच्या पाण्याने पुन्हा त्याच कचºयात मिसळून नाल्यात जातो. पालिकेचे अधिकारी हे नालेसफाईचा उद्योग फक्त पैसे खाण्यासाठीच करीत आहेत, असा आरोप ३ मे रोजी पालिका आयुक्त जयस्वाल यांना दिलेल्या पत्रामध्ये आव्हाड यांनी केला होता. आताही नालेसफाईला उशिर झाला असून गेल्या वर्षी रामचंद्रनगर, संभाजीनगर परिसरातील नाल्यांमधून दोन महिला वाहून गेल्याच्या घटनेकडेही त्यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात लक्ष वेधले आहे.
ठाण्यातील नालेसफाईची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी : जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 11:49 PM