मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या २७ पैकी १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे केली. त्याचप्रमाणे, शहरीकरण झालेली लगतची नऊ गावे मात्र महापालिका क्षेत्रात असतील, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.फडणवीस सरकारच्या काळात या २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश करण्याबाबतचा निर्णय झाला होता. तेव्हापासून विविध नागरी संघटनांनी आंदोलने केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला आला होता. अखेर आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदनाद्वारे या गावांबाबतचा निर्णय जाहीर केला. २७ गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याबाबत स्थानिकांकडून मागणी केली होती. त्यानंतर, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातून २७ गावे वगळून नगरपरिषद स्थापन करण्यासाठी अधिसूचना जाहीर करत, त्याबाबत हरकती, सूचना मागविण्यात आल्या. त्यानुसार, कोकण विभागीय आयुक्तांकडे हरकती, सूचना दाखल करण्यात आल्या आणि ११ व १२ मार्च रोजी आयुक्तांनी त्यावर सुनावणी घेतली. कोकण विभागीय आयुक्तांनी १३ मार्च रोजी याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या शीळ कल्याण रस्त्याच्या पश्चिमेला असणाऱ्या नऊ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. त्यामुळे ही नऊ गावे महानगरपालिका क्षेत्रात कायम राहणार असून, इतर अठरा गावांची स्वतंत्र नगर परिषद होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ही ९ गावे राहणार केडीएमसीतआजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, धारीवली, संदप, उसरघर, काटई, भोपर, देसलेपाडास्वतंत्र नगरपरिषदेत समाविष्ट होणारी गावे : घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवलीतर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे.
केडीएमसीतील २७ पैकी १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 6:09 AM