उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होम जिल्ह्यात भाजपच्या वर्चस्वावरून पोस्टर्सबाजी सुरू असताना, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे शहरात पोस्टर्स झळकल्याने विविध चर्चेला उधाण आले. मात्र के चंद्रशेखर राव यांच्या फोटोसह पक्षाचे पोस्टर्स कोणी लावले? याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.
उल्हासनगरात बहुसंख्य सिंधी समाज असलातरी, मराठी, मुस्लिम, उत्तरभारतीय, साऊथ, मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात राहतो. उल्हासनगर शहर हे तीन विधानसभा मतदारसंघात विभागले गेले असून शहरात एकून साडे चार लाख पेक्षा जास्त मतदार संख्या आहे. कॅम्प नं-१,२ व ३ तसेच म्हारळ, वरप, कांबा आदी गाव मिळून उल्हासनगर मतदारसंघ निर्माण झाला. तर कल्याण पूर्व मतदारसंघात शहरातील कॅम्प नं-४ मधील ३५ हजार मतदार आहेत. तसेच अंबरनाथ मतदारसंघात शहरातील कॅम्प नं-४ व ५ मधील १ लाख ३५ मतदार आहेत. कल्याण पूर्व व अंबरनाथ मतदारसंघात शहरातील शिवसेनेचे धनंजय बोडरे व काँग्रेसचे रोहित साळवे यांनी क्रमांक दोनची मते घेतली होती. शहरातील ही मतदारसंख्या आपल्याकडे वळविण्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस, रिपाई गट यांच्यात चढाओढ असल्याचे चित्र आहे.
कल्याण शहरा पाठोपाठ उल्हासनगरात भाजपने पोस्टर्सबाजी करून शिवसेना शिंदे गटाला प्रतिउत्तर दिल्याने, शिंदे गट एकाएकी पडल्याचे चित्र आहे. तसेच कलानी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट व रिपाई आठवले गटाची ताकद शहरात मोठी आहे. शहरातील रिपाई आठवले गट भाजप सोबत राजकीय युती न करता नेहमी वेगळी चूल मांडतो. त्याचा फटका भाजप व शिवसेना शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचे लोण ठाणे जिल्हातील उल्हासनगरात पसरले असून नेताजी चौक, १७ सेक्शन ठिकाणी पोस्टर्स झळकले आहेत. के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केल्याचे गेल्या दिवसातील त्यांच्या राज्यातील सभा व इतर कार्यक्रमावरून उघड केले आहे.
पोस्टर्स लावणाऱ्याचे नावे गुलदस्त्यात? शहरातील नेताजी चौक, १७ सेक्शनसह अन्य मुख्य ठिकाणी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे फोटोसह पक्षाचे पोस्टर्स शहरात झळकल्याने, वेगळ्याच चर्चेला उधाण आले. तसेच पोस्टर्स कोणी लावले, त्यांचे नवे अद्यापही गुलदस्त्यात आहेत. महापालिकेलाही पोस्टर्सबाबत माहिती नाही.