ठाणे : ठाण्यातील वावीकर रुग्णालयात शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघे ८ मिनिटात मुख्यमंत्र्यांच्या उजव्या (राईट) डोळ्याच्या मोतीबिंदूची अत्याधुनिक पध्द्तीने शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर रुग्णालयातून मुख्यमंत्र्यांना तासाभरात घरी सोडण्यात आले. या शस्त्रक्रियेने मुख्यमंत्री शिंदे यांच्या चष्माचा नंबर ही निश्चित कमी होणार आहेच. शिवाय त्यांना दोन दिवस सक्तीचा विश्रांती (आराम) करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी वावीकर रुग्णालयात जाऊन डोळे तपासणी केली होती. त्यानुसारच शुक्रवारी त्यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे मुख्यमंत्री सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर शस्त्रक्रिया पार पडल्यावर ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घरी परतले. अवघे ८ मिनिटे चाललेल्या या शस्त्रक्रियेच्या वेळेस अमेरिकन कंपनीची लेन्सचा वापर करण्यात आल्याने त्यांच्या चष्माचा नंबर ही कमी होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉ वावीकर यांच्यासह २० जणांचे पथक ऑपरेशनच्या वेळी तेथे उपस्थित होते.
अशी झाली शस्त्रक्रिया
शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांना कोणतेही इंजेक्शन दिले गेले नाही. तर, यावेळी भूल देण्यासाठी डोळ्यात औषधाचे थेंब टाकण्यात आले. तसेच एक ही टाका टाकण्यात आला नाही. याशिवाय त्यांना एक ही पेन किलरची गोळी देण्यात आली नसल्याची माहिती डॉ. वावीकर यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन दिवस मेडिटेशन केले आहे. हे मेडिटेशन कॉन्फिडन्स राहण्यासाठी केले. तसेच तत्पूर्वी देवालाही हात जोडले होते. अखेर ती शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
- डॉ चंद्रशेखर वावीकर, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर