लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आधीच विसविशीत संघटनेचा फटका निवडणुकीत बसल्याने आतापासूनच नागरिकांच्या जिव्हाळ््याचे विषय हाताळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाण्यातील भाजपाच्या नेत्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनीच धक्का दिल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांची पालिका आयुक्तांवर मर्जी असूनही त्यांच्याविरोधात तक्रारी करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना ते भेटीसाठीही वेळ देत नसल्याने या नेत्यांची पुरती कोंडी झाली आहे. प्रश्न सोडवा किंवा सोडवू नका, पण ते मांडण्यासाठीही नेते वेळ देत नसतील, तर नंतर त्याचे खापर संघटनेवर फोडू नका, अशी अस्वस्थताही या नेत्यांनी व्यक्त केली. वादग्रस्त ठरलेल्या महासभेतील मैदानांच्या विषयांवरून भाजपा नगरसेवकांनी आयुक्तांविरोधात भूमिका घेतली आहे. शहरातील मैदाने बिल्डरांच्या घशात जाणार असल्याने आणि नागरिक, पर्यावरणप्रेमी, खेळाडूंचा त्याला विरोध असल्याने भाजपानेही हा मुद्दा उचलून धरला. मुख्यमंत्री हस्तक्षेप करून हा ठराव रद्द करतील, असे नगरसेवकांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी एका मंत्र्याला आणि माथाडी कामगार संघटनेच्या नेत्यांना मध्यस्थीसाठी सांगितले. पण आयुक्तांविरोधात तक्रार करणार असाल, तर मुख्यमंत्री भेटणार नाहीत, असे मंत्र्याने सुनावल्याचे समजते. सत्ताधारी शिवसेनेने आयुक्तांशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे कोणतीही चर्चा न करता अनेक प्रस्ताव मंजूर झाले. त्याचा शहराच्या विकासावर विपरित होणार असल्याचा मुद्दा मांडत भाजपा आणि राष्ट्रवादीने सेनेच्या कोंडीचा प्रयत्न केला. आयुक्तांनाही घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आक्रमकतेविरोधात भाजपाने धरणे धरले. राष्ट्रवादी निषेधाचे फलक लावत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवले. तरीही मुख्यमंत्री भेटत नसल्याने भाजपा नेते कमालीचे नाराज झाले आहेत. आयुक्तांवर प्रेम असेलही...मुख्यमंत्री ठाण्यात आले की आयुक्त संजीव जयस्वाल यांना हमखास भेटतात. त्यांच्या घरी जातात. पण आम्हाला भेटण्यास त्यांना वेळ नाही. असे असेल तर पक्षाच्या नेत्यांना काहीच किंमत नाही का, असा प्रश्न पक्षाच्या काही नेत्यांनी इतर मंत्र्यांकडे केला. आयुक्त मुख्यमंत्र्यांचे लाडके असले तरी त्यांनी किमान पक्षातील नेत्यांची भूमिका समजून घ्यायला हवी, एवढेच आमचे म्हणणे आहे.
भाजपा नेत्यांना मुख्यमंत्र्यांचा धक्का
By admin | Published: May 26, 2017 12:08 AM