ठाणे : गेली दोन वर्षे केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा बारकाईने अभ्यास केलेल्या शिवसेनेने ठाण्यातील शिवसेनेचा गड ताब्यात राखण्याकरिता भाजपच्या संघटनात्मक बांधणीची ब्ल्यू प्रिंट कॉपी करण्याचा निर्णय घेतला आहे. बूथनिहाय पक्ष बांधणी करण्याकरिता शिवसैनिकांना कामाला लावण्याचा निर्णय बुधवारी ठाण्यातील बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सरकारचा चेहरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असल्याने या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना लोकांपर्यंत पोहोचवून सरकारच्या निर्णयांचा जास्तीत जास्त लाभ शिवसेनेला निवडणुकीत कसा होईल, याकरिता प्रयत्न करण्याचे निश्चित केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना ठाण्यात कामाला लागली आहे. विधानसभानिहाय बैठकांचा सपाटा सुरू आहे. भाजपची संघटनात्मक बांधणी, दिल्लीतील नेत्यांकडून बूथ स्तरावरील पक्ष बांधणीकडे दिले जाणारे लक्ष अशा सर्व बाबींचे शिवसेनेने जवळून अवलोकन केले आहे. त्यानंतर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला बूथस्तराची जबाबदारी घेण्याचे आदेश दिले. सरकारने गेल्या दोन वर्षांत असंख्य निर्णय घेतले, केंद्र व राज्याच्या योजना राबविल्या, त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायच्या आहेत. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने तो आपल्याच ताब्यात राहण्यासाठी सर्वांना कामाला लागा, असे आदेश बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभेबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन
आनंद आश्रम येथे ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी येथील पदाधिकाऱ्यांची बैठक अलीकडेच घेऊन ठाणे, कल्याणवर भाजप दावा करीत असेल तर भिवंडीसुद्धा आम्ही लढवू, असा इशारा शिवसेनेने बैठकीत दिला होता. त्यानंतर बुधवारी ठाण्यातील माजी नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांची बैठक आनंद आश्रम येथे पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे लोकसभेबाबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत उपस्थितांनी मार्गदर्शन केले. ठाणे शहर नव्हे तर ठाणे जिल्ह्यावरील शिवसेनेची पकड ढिली होऊ द्यायची नाही, असा निर्धार बैठकीत व्यक्त केला.
मतदारांच्या समस्या झटपट सोडवा
मतदारांच्या समस्या किरकोळ असतात. त्यांच्या काय समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा, असा संदेश देण्यात आला. प्रत्येक महत्त्वाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या खांद्यावर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत.
महापालिका क्षेत्रातील माजी नगरसेवकांची व विभागप्रमुखांची संघटनात्मक बैठक घेण्यात आली होती. यात संघटनात्मक कार्यक्रम तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यात येऊन प्रत्येक बूथवर कसे लीड घेता येईल याबाबतचा कार्यक्रम देण्यात आला.
- नरेश म्हस्के, प्रवक्ता, शिवसेना