मीरा रोड : राजस्थानवासीयांसाठी शासकीय जमीन मंजूर करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भार्इंदर येथील राजस्थानवासीयांच्या होळी महासंमेलन कार्यक्रमात दिली. ‘जय राजस्थान’ म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.इंद्रलोक येथील स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानात राजस्थानी छत्तीस कौम एकता परिषद, जालोर-सिरोही विकास परिषद, राजस्थानी मेवाड प्रवासी संघ, ३६ कौम एकता मंडळ, पाली जिल्हा प्रवासी संघ, सिरोही-जालोर प्रवासी संघ यांनी संयुक्तपणे राजस्थानी होळी महासंमेलनाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी केले होते. राजस्थानी होळी कार्यक्रमासाठी आपण आवर्जून भार्इंदरमध्ये आलो असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात जाहीर केले. राजस्थानी साफा घालून फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. महापौर डिम्पल मेहता, आ. नरेंद्र मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, सभागृह नेते रोहिदास पाटील, स्थायीचे सभापती ध्रुवकिशोर पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर, शहरप्रमुख धनेश पाटील, संमेलनाचे आयोजक अध्यक्ष गोविंद राजपुरोहित, रतनसिंह राठोड, प्रताप पुरोहित आदी उपस्थित होते.मीरा-भार्इंदर हे मिनी राजस्थान असून राजस्थानी समाजाने नेहमीच देण्याचे काम केले आहे, असे आ. मेहता म्हणाले. महाराष्ट्र दूध तर राजस्थान साखर असून राजस्थानी जेवढे येतील, तेवढी महाराष्ट्राची भूमी गोड होत जाईल, असे स्व. गोपीनाथ मुंडे म्हणायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली. पालिकेने महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचा ठराव केला आहे. त्याची मंजुरी शासनाकडून येत्या जयंतीपूर्वी मिळेल, अशी आशा आ. मेहता यांनी व्यक्त केली. शासनाने राजस्थानी समाजासाठी भूखंड द्यावा, अशी मागणीही मेहता यांनी केली.फडणवीस म्हणाले की, आपल्यासमोर संपूर्ण राजस्थान दिसत आहे. मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या वेळी आलो असता गोविंद पुरोहित यांनी सांगितले की आम्ही सर्व भाजपालाच निवडून देणार देतो. मात्र, पालिका जिंकून दिल्यावर तुम्हाला होळीच्या कार्यक्रमाला यावे लागेल, अशी अट घातली होती. त्यानुसार, आपण राजस्थानी होळी संमेलनास आलो आहोत.राजस्थानी समाजाने आपल्याला खूप प्रेम दिले आहे. तुम्हाला गरज असेल तेव्हा सांगा, मी अर्ध्या रात्री येईन. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेले ‘वर्षा’ हे तुमचेच घर आहे, असे फडणवीस म्हणाले. राजस्थानमधून येणारे प्रवासी, उपचारासाठी येणारे लोक यांच्यासाठी भूखंडाची केलेली मागणी रास्त असून आ. मेहता यांनी जागा शोधून द्यावी. ती तत्काळ शासन मंजूर करील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचा नारा ‘जय राजस्थान’; राजस्थानी समाजासाठी शासकीय भूखंड देण्याची दिली ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 2:55 AM