अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरमधील प्रस्तावित चिखलोली रेल्वेस्थानकासाठी भूसंपादनाचे अधिकार आता जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीला देण्यात आले आहेत. यामुळे गेल्या वीस वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रकल्पासाठी लवकरात लवकर भूसंपादन करावे, असे निर्देश खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भातील बैठकीत दिले. यावेळी आमदार बालाजी किणीकर हे उपस्थित हाेते.
केवळ रेल्वेस्थानकासाठी जागा संपादित करून चालणार नसून, रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या रस्त्यांसाठीदेखील जागा ताब्यात घेण्याची गरज यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली. गेल्या वीस वर्षांपासून चिखलोली रेल्वेस्थानकाची चर्चा अनेक वेळा करण्यात आली. एवढेच नव्हे, तर या स्थानकाचे गाजर दाखवून अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या सदनिकांची विक्रीदेखील केली. मात्र, गेल्या वीस वर्षांत या स्थानकाबाबत कोणताही कागद पुढे सरकला नव्हता. खासदार शिंदे आणि आमदार किणीकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले असून, भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.