लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुब्रा येथून जवळच असलेल्या दिवा शहरातून अपहरण झालेल्या एका सात वर्षीय मुलाची मध्यप्रदेशातील इटारसी येथून सुटका करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या मुलाचे अपहरण करणाऱ्या रिंकू सरोज (३५, रा. उत्तरप्रदेश ) याला इटारसी रेल्वे पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली असून मुलाला मंगळवारी पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.दिवा येथील रहिवाशी रेश्मा राठोड (३०) यांनी २४ जानेवारी २०२१ रोजी आपला सात वर्षीय मुलगा लकी याचे अपहरण झाल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात केली होती. या घटनेचा समांतर तपास मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक करीत होते. दरम्यान, या महिलेसोबत राहणारा रिंकू सरोज हा तिला उत्तर प्रदेश येथे येण्यास आग्रह करीत होता. रेश्मा हिने मात्र उत्तरप्रदेशात जाण्यास त्याला स्पष्ट नकार दिला होता. यातूनच संतापलेल्या रिंकूने रेश्माच्या मुलाचे अपहरण केल्याची बाब तपासात समोर आली. या मुलासोबत रिंकू रेल्वेने प्रवास करीत असल्याची माहिती त्याच्या मोबाईलच्या आधाराने पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक माने यांच्या पथकाने मध्य प्रदेशातील प्रयोगराज आणि इटारसी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. प्रयागराज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मीना, उपनिरीक्षक अमित द्वीवेदी आणि इटारसी रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्र यांच्या पथकाने रिंकूला या मुलासह ताब्यात घेतले. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक माने यांच्या पथकाने या मुलाला ताब्यात घेतले. आरोपी रिंकू याला २६ जानेवारी रोजी मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिले असून या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती निरीक्षक ठाकरे यांनी दिली.
मुंब्रा येथून अपहरण झालेल्या मुलाची मध्यप्रदेशातून सुखरुप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:01 AM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुब्रा येथून जवळच असलेल्या दिवा शहरातून अपहरण झालेल्या एका सात वर्षीय मुलाची मध्यप्रदेशातील इटारसी ...
ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी आईवरील रागातून मुलाचे केले अपहरण