कल्याण: चिरंजीवी संघटनेच्या मुलांनी बालमजुरी थांबली पाहिजे असा संदेश देत पथनाटय सादर क रून नागरिकांमध्ये जनजागृती केली.मुलांनी बालमजुरी विरोधी दिनाचे औचित्य साधून मंगळवारी कल्याणमधील काही परिसरात पथनाटय सादर केले. चिरंजीवी संघटना लहान मुलांच्या विविध प्रश्नांवर काम करीत असते. पथनाट्याच्या माध्यमातून लहान मुलांच्या प्रश्नांविषयी समाजात जनजागृती करीत असते. मुलांना समुपदेशन क रणे, त्यांच्यातील कलागुणांची ओळख व्हावी म्हणून विविध प्रकारचे गेम घेणे अशी कामे संस्थेच्या माध्यमातून केली जातात. ही संस्था महाराष्ट्रभर कार्यरत आहे. संस्थेत कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, अंधेरी या परिसरातील सुमारे १२० हून अधिक मुलांचा समावेश आहे. एका पथनाटयात १० ते १२ मुलांचा सहभाग असतो. प्रत्येक पथनाटय सादरीकरण करताना नव्या मुलांना संधी दिली जाते. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. समाजात जनजागृती करण्यासाठी लहान मुले हे प्रभावी माध्यम आहे. एखादी गोष्ट लहान मुलांनी सांगितल्यास समाज त्यांचे लवकर अनुकरण करतो. यापूर्वी संस्थेने फटाकेमुक्त दिवाळी, सरकारी योजनापासून दुर्लक्षित राहणारी मुले, लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळणारी कुपोषणाची समस्या आदी विषयावर पथनाटय बसविली आहेत. आता संघटनेतर्फे बालमजूरी विरोधी पथनाटय बसविले होते. कल्याणमधील सिध्दार्थनगर, आनंदवाडी आणि मिंलिदनगर या तीन ठिकाणी हे पथनाटय सादर करण्यात आले. हे पथनाटय संदीप बनसोडे, सुजल जठार, वैष्णवी जठार, सक्षम पवार, हर्ष तेलुरे, ऐश्वर्या तोडकरी, सुमित तायडे, अंजली वाघ, राहुल भाट, हर्षद चौधरी या लहान मुलांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सादर केले.पथनाटयाच्या माध्यमातून बालपण वाचवा, देश वाचवा तसेच बालमजुरी पूर्णत: बंद झाली पाहिजे. व त्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी जर कोणाला कोठेही बालमजूर काम करताना आढळला तर त्याठिकाणी जाऊन ते थांबविण्याचा प्रयत्न आपल्यापासून झाला पाहिजे, असे आवाहान संघटनेच्या राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी केले आहे.
चिमुकल्यांनी पथनाट्यातून दिला बालमजूरी विरोधी संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 8:06 PM