भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथे बंगल्याचे लोखंडी गेट अंगावर पडून झालेल्या अपघातात कन्हैया दुबे (७) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी नारपोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पूर्णा येथील भाजप युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष प्रफुल्ल ऊर्फपप्पू खंडागळे यांचा आनंद व्हीला हा बंगला असून या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर लोखंडी गेट लावण्यात आले आहे. गुरु वारी दुपारी दीडच्या सुमारास या बंगल्याच्या गेटवर चढून मुले खेळत होती. त्यावेळी गेटवर चढून मुलांनी गेट जोरजोरात हलवले, त्यामुळे गेट जमिनीवर पडले. यामध्ये तीन ते चार मुले सापडली, मात्र कन्हैया याच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला काल्हेर येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.या घटनेची नारपोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून त्याचे पालक मानसिक तणावाखाली आहेत. त्यामुळे त्यांचे जबाब नोंदविल्यानंतरच या घटनेस कोण जबाबदार आहे, हे तपासून त्याच्याविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली.>माझा दुर्घटनेशी संबंध नाहीमी नववर्षाच्या स्वागतासाठी कुटुंबासमवेत काश्मीरमध्ये आलो आहे. मी उद्या घरी परतणार आहे. घरी आई एकटीच आहे. त्यामुळे झालेल्या घटनेची माहिती मला समजली आहे. माझ्या घराच्या गेटवर शेजारची व माझी मुलेही खेळत असतात. मात्र, आम्ही घरात नसल्याने खेळणाऱ्या मुलांनी गेटवर चढून जोरजोरात हलवल्याने ते खाली पडून दुर्घटना घडली आहे. त्यामुळे या दुर्घटनेशी माझा संबंध नाही, अशी प्रतिक्रि या प्रफुल्ल खंडागळे यांनी दिली आहे.
लोखंडी गेट अंगावर पडून मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 5:15 AM