ठाणे : अपघातानंतर तासभर वाट पाहूनही वेळेत रुग्णवाहिका मिळू न शकल्याने कल्पेश गायकवाड (२६, रा. पाचपाखाडी) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. भरधाव गाडी चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात कल्पेशविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.कल्पेश रात्री घरातून बाहेर पडला. त्यानंतर मुंबई- नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावरील उड्डाणपुलावरून भरधाव वेगातच तो मुंबईच्या दिशेने जात होता. सेवा रस्त्याकडे वळतांनाच कारवरील नियंत्रण सुटले. दुभाजकाला धडकून पदपथावर कार धडकली. तो कारच्या बाहेर फेकला गेला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बराच वेळ रस्त्यावर होता. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी तिथून जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही इशारा केला. मात्र, एक तासाच्या अवधीत एकही रुग्णवाहिका थांबली नाही. अखेर ११.४८ च्या सुमारास एका रुग्णवाहिकेतून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दाखल करण्यापूर्वीच त्याचाही मृत्यू झालेला असल्यामुळे न्यायालयात अबेटेड समरी दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार शिवाजी गायकवाड यांचा तो मुलगा होता.कल्पेशची कार वेगात होती. वेगावर नियंत्रण करता न आल्याने सेवारस्त्याकडे वळण घेत असताना हा अपघात झाला.- अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे
अपघातानंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 1:27 AM