लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : डहाणूतील नरपड समुद्रात पोहण्यासाठी गेलेला ओम किशोर म्हात्रे (वय १३, रा. नरपड, कतवार आळी) हा शुक्रवारी दुपारी बुडाला. मात्र, भीतीपोटी त्याच्या मित्रांनी ही माहिती घरी दिली नाही. ओमचा मृतदेह शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आगरच्या ताडगूळ किनाऱ्यानजीक आढळला.
शुक्रवारी दुपारी नरपड समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी ओम गेला होता. तेथे त्याचे अन्य चार मित्र पोहत असल्याने तोही पोहायला गेला. मात्र, बराचवेळ होऊनही तो घरी न परतल्याने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. त्याच्याबरोबर असलेल्या अन्य मित्रांनी तो बेपत्ता झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर ओम बुडाला, मात्र भीतीपोटी सांगितले नसल्याची माहिती चौघा मित्रांनी रात्री अकराच्या सुमारास दिली. शनिवारी सकाळपासून डहाणू पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव बंडकर यांनी पोलीस पथकासह नरपड, आगर, पारनाका येथील समुद्रकिनारी मृतदेह शोधण्यासाठी सागररक्षक दलाचे जवान, स्थानिक नागरिकांची मदत घेतली.
यावेळी ओहोटीमुळे समुद्राचे पाणी खोल गेले असल्याने गुडघाभर चिखलातून शोधाशोध सुरू होती. याकरिता तटरक्षक दलाची मदत घेण्यात आली. यावेळी हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम सुरू होती, तर दुसरीकडे स्थानिक दिवसभर शोध घेत होते. दुपारी भरती सुरू झाल्यावर आगर समुद्रकिनारी मृतदेह लाटांवर पुढे येत असल्याचे काहींना दिसले. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली.
सावधगिरी बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन उन्हाळी सुट्टी पडली असून, उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने मुले समुद्र आणि पाणवठ्यांवर पोहण्यासाठी जातात. यावेळी अपघात होऊन तत्काळ मदत न मिळाल्यास प्राण गमवावा लागतो. मुलांना चौपाटीवर खेळू द्या, मात्र समुद्रात पोहण्यापासून रोखल्यास असे प्रकार टाळता येतील. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी केले आहे.