डोंबिवली : सिद्धार्थ गणेश कानंगट्टा या पाच वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजता पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरातील भोईरवाडीतील शीताईनगर शिवमंदिरनजीक घडली. सकाळी तो घराबाहेर खेळता खेळता बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबाने आणि परिसरात राहणाऱ्या अन्य नागरिकांनी त्याचा शोध घेतला, पण त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, विहिरीत पडलेल्या सिद्धार्थचा मृतदेह दुपारी १२.३०च्या पाण्यावर तरंगू लागला. आजूबाजूच्या नागरिकांच्या हे चित्र निदर्शनास पडताच याची माहीती त्याच्या कुटुंबाला दिली. लागलीच सिद्धार्थला पाण्याबाहेर काढून केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तपासून तो मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या घटनेची टिळकनगर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे भोईरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बालकाचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:48 AM