कसारा - बालविवाह हा गुन्हा असून तो रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात समुपदेश केले जाते. मात्र आजही अनेक ठिकाणी बालविवाह केला जातो. असाच एक बोहल्यावर चढण्याअगोदरच होऊ घातलेला बालविवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे. शहापूर येथील मोखवणेमध्ये बालविवाह होणार असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोखवणे येथे मंगळवारी (19 नोव्हेंबर) दुपारी दोन लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातील एक विवाह अल्पवयीन जोडप्यांचा होणार होता. 12 वर्षाची चिमुरडी व 18 वर्षाचा मुलगा यांचा विवाह होणार होता. परंतु या बालविवाहाची माहिती शहापूरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी व ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांना मिळाली होती.
मोखवणे येथील बालविवाहाची माहिती मिळताच दोन्ही अधिकाऱ्यांनी तातडीने कसारा पोलीस ठाणे व मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील यांना सूचना केल्या. तसेच विवाहस्थळी पोहचून बालविवाह रोखण्याच्या सूचना केल्या. वरिष्ठांचा आदेश मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के. बी. केंद्रे, मंडळ अधिकारी चौधरी, तलाठी भरत गांजवे, ग्रामविकास अधिकारी पाकळे यांनी मोखवणे गाव गाठले व पोलीस पाटील पांडुरंग भोईर यांना सोबत घेऊन विवाह होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
12 वर्षाच्या मुलीला हळद लावून डोक्याला बाशिंग बांधून लग्न मंडपात आणण्याची तयारी सुरू होती. इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या या मुलीचा विवाह हा गावातील एका 18 वर्षाच्या मुलाशी होणार होता. मात्र विवाहाच्या ठिकाणी पोलीस व अन्य लोक आल्याने मांडवातील वऱ्हाडी व मुला-मुलीच्या नातेवाईकांचा एकच गोंधळ उडाला. समय सूचकता दाखवून आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी सर्वांना शांत केले व स्थानिक महिला, बचतगट, शिक्षक यांना सोबत घेऊन मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले.
काही दिवसांपूर्वी उमरगा येथील एका कुटुंबाने १४ वर्षीय बालिकेचा विवाह निश्चित केला होता. मात्र, तत्पूर्वीच याची माहिती प्रशासनाला मिळाल्याने अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना कायद्याची माहिती दिली. तब्बल 7 तास झालेल्या चर्चेनंतर अखेर ते कुटुंब बालविवाह थांबविण्यास राजी झाले अन् ‘त्या’ अल्पवयीन मुलीची बालदिनी बालविवाहातून सुटका झाली. संबंधित कुटुंबाने 20 नोव्हेंबरला विवाह नियोजित केल्याची माहिती बालविवाह प्रतिबंध समितीस मिळाली होती. समितीचे सदस्य सचिन बिद्री यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या माध्यमातून प्रयत्न केले.