लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : घरात पाहुणा म्हणून राहणाऱ्या एकाने त्याच घरातील तरुणीशी छेडछाड व मारहाण करताना सहा वर्षीय मुलाने पाहिले असता, हे प्रकरण मुलगा आईला सांगेल, या भीतीने त्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याची घटना हायवे दिवे गावात घडली होती. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी २४ तासांत संभाजीनगर येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत कामत यांनी दिली. आरोपीला १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कन्नड येथून घेतले ताब्यात अमोल चव्हाण (२२) असे आरोपीचे नाव आहे. तर सुधीर विष्णू पवार (६) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. हायवे दिवे येथील ओमसाई राम बिल्डिंग येथील सुधीर यास २१ जुलै रोजी बेशुद्धावस्थेत कळवा येथील शासकीय रुग्णालयात त्याचे नातेवाईक उपचारासाठी घेऊन गेले होते. डॉक्टरांनी सुधीरला मृत म्हणून जाहीर केले.
शवविच्छेदन अहवालातून सुधीरचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नारपोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलिस निरीक्षक विजय मोरे व त्यांचे पथक अमोल याच्यावर संशय आल्याने त्याच्या शोधासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे दाखल झाले. तिथे लपून बसलेल्या अमोलला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्या केल्याची कबुली दिली.
छतावर नेले आणि गळा आवळला २१ जुलै रोजी अमोल याने सुधीरची मोठी बहीण चंपा हिची छेड काढली होती व मारहाण केली होती. ते सुधीरने पाहिले होते. ही घटना आई-वडिलांना सांगणार, असे सुधीर म्हणाला होता. त्यामुळे अमोलने सुधीरला इमारतीच्या छतावर नेऊन गळा आवळून त्याची हत्या केली होती.