ठाणे : पैशांसाठी मुलगा आणि सुनेकडून होणा-या अतोनात छळाला कंटाळून एका वयोवृद्ध मातेने आत्महत्या केल्याची घटना ठाण्यातील शास्त्रीनगरात घडली. पोलिसांनी मुलासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला.ठाण्यातील शास्त्रीनगरात इंदुबाई कदम (७८) यांची स्वत:ची चाळ आहे. तेथील आठ खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या असून एका खोलीत इंदुबाई, त्यांचा मुलगा प्रवीण आणि त्याची पत्नी सुनीता एकत्र राहायचे. इंदुबार्इंचे पती एका कंपनीत कामाला होते. पती वारल्यापासून त्यांना एकुलता एक मुलगा प्रवीण याचाच आधार होता. प्रवीण हा वायरमन असून त्याची पत्नी सुनीता घरकाम करते. वय वाढल्यामुळे इंदुबाई थकल्या होत्या. त्यांचा सांभाळ करणे प्रवीण आणि सुनीताला त्रासदायक वाटत होते. चाळीतील खोल्यांचे प्रत्येक महिन्याला येणारे भाडे इंदुबाई स्वत:जवळ ठेवायच्या. त्यावरून मुलगा आणि सून दोघेही आईला नेहमी टोमणे मारायचे. त्यावरून त्यांच्यात भांडणेही व्हायची. २१ डिसेंबर २०१७ रोजी त्यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यावेळी अंगावर रॉकेल ओतून घेऊन मरून जा, अशा शब्दांत दोघांनीही आईला आत्महत्येस प्रवृत्त केले होते. नेहमीची भांडणे आणि एकुलता एक मुलगा- सुनेकडून होणाºया छळाला कंटाळून इंदुबार्इंनी त्याच दिवशी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून दिले.नवी मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ इंदुबार्इंवर उपचार करण्यात आले. २५ डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. इंदुबार्इंच्या कन्या प्रभा अय्यर (५३) या विरार येथे समाजसेविका आहेत. त्यांनी याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर प्रवीण आणि त्याच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला. इंदुबार्इंचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवण्यात आला होता. मुलाच्या आणि सुनेच्या छळाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेतल्याचा जबाब त्यांनी दिल्याची माहिती तपास अधिकारी सागर भापकर यांनी दिली.
मुलगा, सुनेच्या छळाला कंटाळून वृद्धेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 5:34 AM