कल्याण - गावी जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात आलेल्या महिलेच्या ८ महिन्यांच्या बाळाला एका व्यक्तीने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत या महिलेने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली असता सीसीटिव्हीमध्ये एक व्यक्ती त्या बाळाला घेऊन जाताना दिसली. पोलिसांनी अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करत चिमुकल्याचा शोध सुरू केला आहे.पश्चिमेतील आंबेडकर रोड परिसरात राधा भोईर पती आणि तीन मुलांसोबत राहते. ८ आॅगस्ट रोजी सायंकाळी राधाचे पतीसोबत भांडण झाले. रागाच्या भरात राधाने आपल्या दोन मुली आणि ८ महिन्यांचा मुलगा कार्तिकला घेऊन रात्री १० च्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक गाठले. चेन्नईला जाणारी एक्स्प्रेस पकडून राधा गावी जाण्याच्या तयारीत होती. कल्याण रेल्वे स्थानकाचा पूल चढत असताना, राधाने एका मुलीचा हात धरला होता. तर दुसरी मुलगी कल्पना हिच्या हातात ८ महिन्यांचा कार्तिक होता. मात्र, मागून आलेल्या व्यक्तीने तिच्या हातून कार्तिकला घेतले आणि तो निघून गेला.याप्रकरणी राधा आणि तिच्या पतीने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे या अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेला सहा दिवसांचा कालावधी लोटला मात्र, अद्याप कार्तिकचा शोध न लागल्याने त्याचे आईवडील काळजीत आहेत.मुलगा घेऊन तो झाला पसारमागून आलेल्या एका व्यक्तीने कल्पनाच्या जवळ जात तिच्या हातात असलेल्या मुलाला आपल्या हातात घेतले. तू तुझ्या आईला पुढे घेऊन ये, असे या व्यक्तीने कल्पनाला सांगितले. कल्पना मागे पडलेल्या आईला पाहण्यासाठी गेली असता, ही व्यक्ती ८ महिन्यांच्या कार्तिकला घेऊन पसार झाली.
बाळ पळवणारा सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 2:38 AM