ठाणे : शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीची माहिती व्हावी, सिग्नल यंत्रणा समजावी आदींसह वाहतुकीचे नियम त्यांना बालपणापासून अंगवळणी पडावेत या उद्देशाने ठाणे महापालिकेने घोडबंदर भागात चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क उभारले आहे. बुधवारी त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. तसेच नितिन कंपनी आणि मानपाडा भागात उड्डाणपुलांखाली सुरू केलेल्या उद्यांनाचा लोकार्पण सोहळा सुद्धा यावेळी पार पडणार आहे.
ठाणे महापालिकेने कासारवडवली येथील कावेसर भागातील आरक्षित भूखंडावर २ एकराच्या परिसरात हे पार्क उभारले आहे. त्याचे काम १ आॅक्टोबर २०१७ रोजी हाती घेतले होते. आता तब्बल दोनवर्षांनंतर पूर्ण झाले आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी वाहतुकीचे नियम, वाहतूक व्यवस्थापन या विषयीचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. यासाठी एक क्लासरूमही सुरू केली आहे. वाहन कसे चालावे याची माहितीदेखील दिली जाणार आहे. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सिम्युलेशन ब्लॉक तयार करणे, लहान मुलांसाठी मोटार बाईक व कारसह सायकल ट्रॅक, दुचाकी वाहनांसाठी अॅडल्ट ट्रेनिंग ट्रॅक, अॅम्पि थिएटर, आर्कषक गेट, लहान मुलांसाठी खेळाची जागा, आरटीओ. लायसन्सकरिता रूम, कॅफेटेरिया, शौचालय, विविध स्कल्पचर्स, लॅन्डस्केपिंग आदी कामे झाली असून आता मुलांसाठी बुधवारपासून ते खुले होणार आहे.
याशिवाय नितीन कंपनी उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण केलेल्या लांबलचक जागेत आता ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण, ४०० मीटरचा जॉगिंग ट्रॅक, कॅडबरी ब्रीजच्या खाली ७०० मीटरचा सायकल ट्रॅक, बच्चे कंपनीसाठी आकर्षक खेळणी, संध्याकाळी जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर खाण्याचा मोह झाल्यास त्यासाठी फूड कोर्ट, आकर्षक उद्यान, रंगीबिरंगी फुलांची नजरेच्या टप्प्यात सामावणारी आकर्षक माळ, लॉन टेनिस, पिकल बॉल, मलखांब, स्केटिंग, स्केट बोर्ड, अत्याधुनिक स्वरूपाची क्लायिबंग वॉल, महिला आणि पुरुषांसाठी शौचालय आदी सुविधांमुळे शहराच्या मध्यवस्तीत असणारी ही जागा नागरिकांसाठी मोक्याचे ठिकाण बनणार आहे. तसेच मानपाडा येथे सुद्धा अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी दुपारी १ ते दोन या वेळेत शिवसेनेचे उपनेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सर्वांचे लोकार्पण केले जाणार आहे. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे आदींसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.