लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्राः शारीरिक संबंधास पत्नीने नकार दिला म्हणून तिची हत्या करून उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला शीळ-डायघर पोलिसांनी अत्यंत शिताफीने चार तासांमध्ये अटक केली. आई या जगात नाही, यापासून अनभिज्ञ असलेला तिचा दोन वर्षांचा चिमुकला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या अंगावर रडत झोपला असल्याचे मन हेलावणारे हे हृदयद्रावक दृश्य बघून घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांचे मनही काही काळ सुन्न झाले होते.
अनेक विवाह केलेल्या शान खान ऊर्फ बाबू याची एक पत्नी दोन वर्षांच्या चिमुकल्यासह डायघर गावातील माऊली अपार्टमेन्टमध्ये राहात होती. तिच्याकडे कधीतरी येणारा बाबू शनिवारी रात्री तिच्याकडे गेला होता. त्यावेळी दोघांमध्ये शारीरिक संबंधावरून वादावादी झाली होती. तसेच तिचे दुसऱ्याशी संबंध असल्याचा त्याला संशय होता. यामुळे संतप्त होऊन त्याने रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रथम तिच्या डोक्यावर चिनीमातीच्या पोळपाटाने प्रहार केला. नंतर तिचे डोके उंबरठ्यावर आपटून तिची हत्या केली. यानंतर शांतपणे घराला बाहेरून कढी लावून तो पसार झाला. पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी त्याने त्याचा नेहमीच्या वापरातील मोबाईल नंबर बंद करून ठेवला होता. तो त्याच्याकडे असलेल्या दुस-या मोबाईल नंबरवरून काहीजणांच्या संपर्कात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मागावर असलेल्या पथकातील तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे आणि भूषण कापडणीस आदींच्या निर्दशनास येताच, मोबाईल लोकेशनची पडताळणी करून एक पथक तो पळून जाण्याच्या हेतूने गाडी पकडण्यासाठी रेंगाळत असलेल्या दादर रेल्वेस्थानकात गेले. तेथे पोलिसांना बघताच त्याने स्थानकातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पंरतु, पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने तिची हत्या का केली, याची कबुली दिली असल्याची माहिती शीळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली.